रायगड : बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरुन वातावरण चांगलंच तापलं असताना राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे मूळ मुद्दा बाजूला पडत आहे. एकीकडे बीड जिल्ह्याचे नेते व कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, तपास यंत्रणांच्या तपासात ज्यांचं नाव येईल, त्यांना सोडणार नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यावरुन, आता अजित पवारांनाही लक्ष्य केलं जात आहे. शिवसेना युबीटी पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनीही बीड प्रकरणावरुन अजित पवारांना (Ajit pawar) लक्ष्य करत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, बीड प्रकरणात मुख्य आरोपीला सोडून इतर कोणालाही सोडणार नाही, अशीच भूमिका मुख्यमंत्र्यांची असल्याचं त्यांनी म्हटलं. आता, संजय राऊत यांच्या टिकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पलटवार केला आहे.
मस्साजोग प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार की धनंजय मुंडे यांना वाचवत आहेत असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. यासंदर्भात सुनील तटकरेंना प्रश्न विचारला असता, संजय राऊत यांचं डोकं फिरल आहे असं वाटतंय. अजित पवारांना वाचविण्याचा प्रश्न कुठे येतोय, असा संतप्त सवाल केला. तसेच, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या स्वरुपात यंत्रणांमार्फत तपास सुरू ठेवला आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास केला जाईल आणि जो कोणी या घटनेत गुन्हेगार आहे, त्याच्यावर कठोर शिक्षा करण्यात येईल, असे स्पष्टीकरणही तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिले. त्यामुळे, राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील पालकमंत्रीपदाच्या बाबतीत जो काही निर्णय आहे, तो मुख्यमंत्री आणि दोन्हीं उपमुख्यमंत्री घेतील असे म्हणत रायगडचे पालकमंत्रीपद कोणाकडे येईल या प्रश्नावर तटकरेंनी उत्तर दिले.
दरम्यान, याप्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीला आणि वाल्मिक कराडवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीला जोर धरत आहे. त्यातच, आज वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केलं जात असताना, त्याच्या आईने परळीत आंदोलन सुरू केलं आहे. माझ्या मुलावरील खोटे गुन्हे माफ करावे, अशी मागणी करत पारुबाई कराड यांनी लेकासाठी आंदोलनाचा मार्ग धरल्याचं पाहायला मिळालं.
धनंजय देशमुख एसआयटी प्रमुखांना भेटणार
SIT चे प्रमुख बसवराज तेली यांची भेट घेण्यासाठी धनंजय देशमुख आणि काही ग्रामस्थ हे दुपारी तीन वाजता मस्साजोगमधून निघतील. केजच्या शासकीय विश्रामगृह येथे बसवराज तेली यांची भेट धनंजय देशमुख आणि मस्साजोग ग्रामस्थांकडून घेतली जाईल. यावेळी, तपासाची सध्याची स्थिती काय यासंदर्भात माहिती घेऊन चर्चा केली जाणार असल्याचे समजते.