Sangli News : सत्तेला नमस्कार घालणारे आम्ही नाही, असा टोला भाजप खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil on Anil Babar in Sangli) यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांना लगावला. सातबारावर कर्ज काढून तुम्ही टेंभू योजना पूर्ण केली नाही, अशी टीकाही खासदार संजयकाका पाटलांनी आमदार अनिल बाबरांवर केली. सांगलीच्या (Sangli News) खानापूर तालुक्यातील हिंगणगादेमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष वाढला


राज्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्रित सत्तेत असतानाही सांगली जिल्ह्यात मात्र भाजप खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्यातील संघर्ष वाढत आहे. सांगलीतील खानापूर तालुक्यातील नागेवाडीमधील यशवंत कारखान्यावरून खासदार संजयकाका पाटील आणि शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्यात सुरु झालेला संघर्ष Sanjaykaka Patil on Anil Babar in Sangli) वाढताना दिसत आहे. सांगलीच्या खानापूर आटपाडी तालुक्यातील टेंभू योजनेच्या श्रेयवादातून भाजप खासदार संजयकाका पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. आमदार अनिल बाबर हे आपणच टेंभू योजनेचे जनक आणि योजना पूर्ण केल्याचा आव आणत असल्याचा आरोप तालुक्यातील विरोधकांकडून करण्यात येत आहे. याच मुद्यावरुन संजयकाका पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांचा खरपूस समाचार घेतला. 


सत्तेला नमस्कार करणारे आम्ही नाही, संघर्ष आमच्या रक्तात


खानापूरच्या हिंगणगादे या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार संजयकाका पाटील म्हणाले की, सत्तेला नमस्कार करणारे आम्ही नाही. संघर्ष आमच्या रक्तात आहे. तसेच टेंभूचे पाणी काय स्वतःच्या सातबारावर कर्ज काढून आणले आहे का? असा खडा सवाल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, तुम्ही जेष्ठ आहात, आम्ही तुमचा आदर करतो पण कुणाला तरी बघून घेतो, कुणाला तरी इन्कम टॅक्स लावतो, कुणाला काय? हे चालणार नाही. सत्तेला नमस्कार करणारे आम्ही नाही. संघर्ष आमच्या रक्तात आहे, असा इशारा भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांना दिला. 


दरम्यान, अलीकडेच ब्राँझ (कांस्य) धातूपासून बनवलेली बैलगाडीची प्रतिकृती आमदार अनिल बाबर यांना शेतकऱ्यांनी भेट दिली आहे. कृतज्ञता म्हणून एक शेतकरी आमदार म्हणून त्यांना काही शेतकऱ्यांनी ही बैलगाडीची प्रतिकृती भेट दिली. साडे तेरा इंच उंच व अडीच फुट लांब असलेली ही बैलगाडीची प्रतिकृती तब्बल 16 किलो वजनाची आहे.


इतर महत्वाच्या बातम्या