Vishal Patil and Congress Party, Sangli : महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. अशातच विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांनी आज (दि.13) सकाळी काँग्रेसच्या फलकावर पांढरा रंग फासला होता. दरम्यान, विशाल पाटील (Vishal Patil) यांनी या सर्व घडोमोडींवर स्पष्टीकरण दिले आहे. तर सांगलीतील (Sangli) काँग्रेस भवनवर काँग्रेसचा नवीन फलक झळकलाय. विशाल पाटलांकडून कार्यकर्त्यांना संयमाचे आवाहन करण्यात आले आहे.
काय म्हणाले विशाल पाटील ?
विशाल पाटील म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार असावा, अशी आमच्या पक्षाची आणि कार्यकर्त्यांची मागणी होती. काँग्रेसच्या यादीत सांगलीचे नाव नसल्यामुळे स्वाभाविकरित्या कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला. मात्र, काँग्रेस पक्षावर तुमचा राग नसावा. आम्ही कुठे तरी कम पडलो असू नेते म्हणून कमी पडलो. मी वैयक्तिक कदाचित कमी पडलो असेन. पक्षाची जागा जात आहे, याबद्दल राग असेल. राग असेल तर वैयक्तिक आमच्यावर काढावा. काँग्रेस पक्षाच्या नावावर पांढर फासण्याचे कार्य काही कार्यकर्त्यांनी केले. त्यांच्या भावना चांगल्या असतील. मात्र, हे विसरु नये की, काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र मिळाले, असंही विशाल पाटील यांनी सांगितले.
काँग्रेसचा फलक पुन्हा एकदा जोमाने लावला
काँग्रेसने देश घडवला. या पक्षामुळेच वसंतदादा मुख्यमंत्री झाले. त्यांनी सांगलीचा विकास केला. त्यामुळे काँग्रेस पक्षावर राग काढू नये, अशी कळकळीची विनंती केली आहे. काँग्रेसचा फलक पुन्हा एकदा जोमाने लावला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना सांगणे आहे की, संयमाने राहिले पाहिजे. आपल्याला भाजपबरोबर लढायचे आहे. काँग्रेस पक्षावर आपण तीन-तीन पिढ्या प्रेम केलंय. देशाच पंतप्रधान काँग्रेसचाच होईल. किती जरी अन्याय झाला तरी संयमाने वागायचे आहे. काही कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहलं, ही त्यांची भावना आहे, असंही विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं.
महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी
महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा विशाल पाटलांना म्हणजेच काँग्रेसला सुटलेली नाही. या जागेवर ठाकरे गटाकडून दावा ठोकण्यात आला. त्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत सभा घेऊन चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या अंतिम यादीमध्येही सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आली. त्यामुळे सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त आणि विशाल पाटलांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या