मिरज (सांगली) : लहान भावाच्या दारू पिऊन आईला शिव्या देण्याच्या दररोजच्या त्रासाला कंटाळून मोठ्या भावाने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील (Sangli Crime) मिरज तालुक्यातील (Miraj) नांद्रे गावामध्ये घडली. दत्तात्रय प्रकाश कुंभार (वय 30) असे मृताचे नाव आहे. राहुल उर्फ बसवेश्वर प्रकाश कुंभार (वय 32, रा. कुंभार गल्ली, नांद्रे) असे संशयित भावाचे नाव आहे. मृताचे वडील प्रकाश यल्लाप्पा कुंभार यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित राहुलला अट़क केली आहे. 


दररोजच्या त्रासाला कंटाळून मोठ्या भावाचे कृत्य 


दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत दत्तात्रयला दारूचे व्यसन असल्याने कुटूंबीयांना वारंवार त्रास देत होता. दारूच्या नशेत आईलाही शिवीगाळ करत होता. त्याच्या शिवीगाळ करण्याचा मोठा भाऊ राहुलला राग येत होता. मुलाच्या शिव्यांना कंटाळून आई-वडील दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेले होते. मात्र, दत्तात्रय तिकडे तिकडं जाऊन  शिवीगाळ करत होता. हा प्रकार वारंवार सुरु होता. बुधवारी (27 सप्टेंबर) रात्री सुद्धा दत्तात्रयने दारून पिऊन आल्यानंतर आईला शिवीगाळ केली. त्यामुळे चिडलेल्या राहूलने लाकडी दांडक्याने मारहाण करत आणि धारदार शस्त्राने वार करून दत्तात्रयचा खून केला. संशयित राहुलला पोलिसांनी अटक केली आहे. 


इस्लामपुरात जुन्या वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी


दुसरीकडे, सांगलीमधील इस्लामपूर शहरातील (Islampur) माकडवाले गल्लीतील दोन गटात जुन्या भांडणाच्या रागातून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीमध्ये लोखंडी गज, झांज पथकातील टाळ, काठ्या, दगड आणि विटांचा वापर करण्यात आला. परस्परांच्या घरांची देखील नासधूस करण्यात आली. 


दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. विनोद वसंत पवार (वय 34, माकडवाले गल्ली) आणि दशरथ राजू पवार (वय 34, माकडवाले गल्ली) अशा दोघांनी फिर्यादी दिल्या आहेत. दोन्ही गटांच्या 76 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनोद पवारने दिलेल्या फिर्यादीत तो ओळखीच्या इतर 10 जणांसोबत घरासमोर बोलत बसला असताना प्रथमेश दिलीप कुचीवाले यानं बेकायदा गर्दी जमवून जुन्या भांडणाच्या रागातून हल्ला केला. दशरथ पवारने दिलेल्या फिर्यादीत तो इतर 12 जणांसमवेत दारात बसले होते. यावेळी विनोद पवार 38 जणांचा बेकायदा जमाव घेऊन चालून आला. या सर्वांनी घरांव दगडफेक करीत नुकसान केल्याचे म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या