मुंबई : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज (11 मार्च) शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. त्यांनी 500 गाड्यांच्या ताफ्यासह मातोश्रीवर जाऊन जोरदार शक्तीप्रदर्शन करत पक्षप्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे जंगी स्वागत करतानाच सांगली लोकसभेसाठी उमेदवारी सुद्धा जाहीर केली. यामुळे जागावाटपात सांगली लोकसभेची शिवसेना ठाकरे गटाला गेल्याचे स्पष्ट झालं आहे. ठाकरेंनी सलग दुसऱ्या दिवशी उमेदवार जाहीर करत रणनीती स्पष्ट केली आहे. यापूर्वी त्यांनी उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यावेळी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना गदा भेट दिली. यावेळी सांगली लोकसभा संघटकपदी चंद्रहार पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. 


उद्धव ठाकरे म्हणाले की, माझी छाती अभिमानाने फुलून आली आहे. किती इंच झाली सांगणार नाही. चंद्रहारची छाती पाहून सांगलीत लढायची कोणाची छाती होणार नाही. पळकुटे नामर्द पळून जात आहेत. मर्द शिवसेनेत येत आहेत. तुम्ही बोर्ड हातात धरला आहे, पण नुसत्या घोषणा देऊन नाही चालणार. जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. चंद्रहार पाटील यांनी सांगितलं तुम्ही काहीतरी संकेत द्या. आता जनतेने संकेत दिले आहेत, आता मी काय संकेत देऊ असे ते म्हणाले. 


आपल्याला हा एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे


ते पुढे म्हणाले आपल्याला हा एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. मी सांगलीत येणार असून महाराष्ट्रामध्ये गद्दार आहेत त्यांना आडवा करायचं आहे. मर्दपणा आपल्याला दिल्लीला दाखवावा लागेल. सांगलीत मी प्राचारला येईल, पण विजयी सभेला सुद्धा येईल असे ते म्हणाले. चंद्रहारजी तुम्ही चला पुढे मी तुमच्या मागे आहे.


कुस्ती क्षेत्रातले सचिन तेंडुलकर शिवसेनेत येत आहेत


संजय राऊत यांनीही चंद्रहार पाटील यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, डबल महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राचं वैभव शिवसेनेत प्रवेश करत आहे. त्यांनी कुस्तीचं मैदान गाजवल आहे. ते कुस्ती क्षेत्रातील सचिन तेंडुलकर आहेत. चंद्रहार शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. सेनेच्या मशालीसोबत चंद्रहारची गदा असणार आहे. अब की बार चंद्रहार ही तुमची घोषणा असल्याचे ते म्हणाले. 


तुम्ही शेतकऱ्याच्या मुलाचा सन्मान केला 


सांगली लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर चंद्रहार पाटील यांनी तुम्ही शेतकऱ्याच्या मुलाचा सन्मान केला असल्याची प्रतिक्रिया दिली. लोकसभा निवडणुकीत पहिला विजयी निकाल सांगलीचा असेल, असे मी वचन देत असल्याचे ते म्हणाले. उद्धव साहेब मी गदा तुम्हाला भेट देत असून तुम्ही शेतकऱ्याच्या मुलाचा आज सन्मान केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या