एलईडी बल्बने शेवंती फुलवण्याचा प्रयत्न, सांगलीत अनोखा प्रयोग
एबीपी माझा वेब टीम | 10 Oct 2018 02:14 PM (IST)
हायब्रीड शेवंती या पिकाची बारा महिने लागवड करुन, उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल यासाठी या नर्सरीत प्रयोग केला जात आहे.
सांगली: सांगली जवळच्या तुंग गावात विकास हायटेक नर्सरीच्या माध्यमातून एक वेगळा प्रयोग केला जात आहे. हायब्रीड शेवंती या पिकाची बारा महिने लागवड करुन, उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल यासाठी या नर्सरीत प्रयोग केला जात आहे. एक एकरावरती शेवंती झाडाची लागवड करुन या परिसरात जवळपास 300 बल्ब लावून दिवसासारखा प्रकाश निर्माण केला जातो. यातून कळ्याच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल आणि ठराविक हंगामाबरोबरच वर्षभर झेंडूप्रमाणे मागणी असलेल्या शेवंती फुलांची लागवड करण्यास मदत होईल, या दृष्टीने प्रायोगिक तत्वावर हा प्रयत्न सुरु आहे. शेवंती या फूलझाडाचा लागवडीचा काळ हा तसा मुख्यत्वे मार्च, एप्रिल, मे दरम्यान असतो.पण झेंडू प्रमाणे या शेवंती फुलाची वाढती मागणी लक्षात घेऊन सांगलीतील तुंग गावातील विकास हायटेक नर्सरीने फूल झाडाचे पीक वर्षभर उत्तम पद्धतीने कसे घेता येईल, यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातूनच शेवंती झाडाच्या भोवती बल्ब लावून झाडाची वाढ चांगली व्हावी आणि कळ्या जास्त याव्यात यासाठी एक प्राथमिक स्तरावर प्रयोग केला जातोय. शेवंती हे साधारण 80-90 दिवसाचे पीक. या पिकाची लागवड केल्यापासून 40 दिवस रात्री असे बल्ब लावून कृत्रिम प्रकाश निर्माण केला जातो. शेवंती हे वातावरणावर आधारीत असलेले पीक मुख्यत्वे मार्च, एप्रिल , मे मध्ये लागवड केली जाते. मात्र वर्षभर हे पीक घेता यावं यासाठी हा प्रयोग तुंग मधील विकास हायटेक नर्सरी करतेय. एक एकरमध्ये 300 बल्ब बसवून रात्रीत दिवसाप्रमाणे उजेड तयार केला जातो. कळ्यांच्या संख्या वाढवण्यासाठी जास्त प्रकाश जास्त काळ ठेऊन हा प्रयोग केला जातोय. जी शेवंती सिझनमध्ये लावली जात नाही त्यासाठी हा प्रयोग रोवपाटीका करत आहे. हा प्रयत्न सध्या प्रायोगिक तत्वावर केला जात असला तरी शेतात रात्रीच्या काळोखात 300 भर बल्ब लावल्याने निर्माण झालेले चित्र पाहण्यासारखे आहे.