पंढरपूर: सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh Murder Case) आणि  परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्यावतीने बुधवार 22 जानेवारीला पंढरपूर येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांनी दिली आहे. या मोर्चास मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील, आमदार सुरेश धस यांच्यासह देशमुख व सूर्यवंशी यांचे कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहे असल्याची माहिती पुढे आली आहे. 


सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुखांचेही कुटुंब मोर्चात सहभागी


सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहेच, परंतु परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची देखील पोलीस कोठडीत हत्याच केली असल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी भोसले यांनी केली आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होण्यासाठी तसेच यातून आरोपींची नावे वगळली जाऊ नयेत, यासाठी आक्रोश मोर्चा आयोजित केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलंय. 


 22 जानेवारीला मोर्चा, अनेकांचा सहभाग 


सोलापूर जिल्ह्याच्या वतीने हा मोर्चा बुधवार 22 जानेवारीला सकाळी अकरा वाजता पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघणार आहे. या आक्रोश मोर्चामध्ये संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच खासदार बजरंग सोनवणे, संभाजीराजे छत्रपती, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, दीपक केदार हे देखील उपस्थित राहणार असल्याचेही नागेश भोसले यांनी सांगितले.


आक्रोश करण्यासाठी राज्यात मोर्चे- धनंजय देशमुख


दरम्यान, या मोर्चे प्रकरणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, आक्रोश करण्यासाठी राज्यात मोर्चे निघत आहे. अशा कृती संपली पाहिजे, गुन्हेगारीला थारा मिळता कामा नये. आमची मागणी आरोपीला लवकरात लवकर पकडा. उद्या पुरावे नष्ट केल्यास त्याची कोण जबाबदारी घेणार? किंबहुना फाशीवर आरोपी लटकेपर्यंत हे थांबणार नाही. तपास यंत्रणेचे काम आहे, यातील धागेदोरे काय ते समाजाच्या समोर असेल. तपास यंत्रणेवर कुणाचा वरदहस्त होऊ नयेत म्हणूनच धनंजय मुंडे यांना पालकमंत्री दिले नसावे असेही धनंजय देशमुख म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या