Rohit Pawar on Manikrao Kokate : विधानसभेचे कामकाज सुरू असताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) शेअर केला होता. त्यावरुन कृषिमंत्री कोकाटेंसह महायुती सरकारवर टीकेची झोड उडाली. या प्रकरणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी हि विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र कृषिमंत्र्याचा रमीचा खेळ हा माफीवर शामला असल्याची चर्चा रंगली असताना विरोधकांनी टीकेची धार आणखीन वाढवली आहे. माणिकराव कोकाटेंच्या चौकशीचा अहवाल आला असून ते सभागृहात 22 मिनिटं रमी खेळत होते, असा दावा आमदार रोहित पवारांनी केला आहे.
कृषिमंत्री सभागृहात केवळ 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते, तर ते तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवालात म्हटले आहे. हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे. सरकार याबाबत खुलासा करेल का? असा सवाल आमदार रोहित पवारांनी केला आहे.
.....तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना नैतिक अधिकार उरतो का?
सभागृहात तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? असा तिखट सवालहि आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
अजित पवारांनी सुनावलं, पण मंत्रीपदाची खुर्ची शाबूत
दुसरीकडे, भर सभागृहात ऑनलाईन पत्ते खेळल्याचा आणि शेतकरी व सरकारची भिकाऱ्यासोबत तुलना केल्याचा आरोप ज्यांच्यावर झाला होता, त्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रीपदाची खुर्ची शाबूत राहणार असल्याचे कळतंय. पक्षप्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांची काल कानउघाडणी केली. "तुमच्या वक्तव्यामुळे सरकार गोत्यात येतंय," अशा शब्दांत अजित पवार यांनी कोकाटे यांना सुनावलं.
यावर कोकाटेंनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात पुन्हा एकदा माफी मागितली आहे. अशी चूक पुन्हा एकदा होणार नाही, अशी हमी सुद्धा त्यांनी दिली आहे. माणिकराव कोकाटे यांनी आज अजित पवार यांची सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन वेळा भेट घेतली होती. या भेटीत "कोकाटे तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, बोलताना भान ठेवा" असे अजित पवार म्हणाले. यावर "माफ करा, चूक झाली, पुन्हा चूक होणार नाही" अशी दिलगिरी कोकाटेंनी व्यक्त केली. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संबंधित बातमी: