मुंबई:  बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यक्षेत्रात रस्‍ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. रस्‍ते विकसित करतानाच उपयोगिता वाहिन्‍यांची देखील कामे सुरू आहेत. एकदा रस्‍तेविकास झाला की, त्‍या रस्‍त्‍यावर खोदकाम, चर करायला तात्‍काळ प्रभावाने मनाई करण्‍यात यावी. त्याचप्रमाणे काँक्रिटीकरणासाठी नव्‍याने रस्‍ते खोदकाम करू नये, असे स्‍पष्‍ट निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.


बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात एकूण 324 किलोमीटर (698 रस्‍ते) तर दुसऱ्या  टप्प्यात 377 किलोमीटर (1420 रस्‍ते) असे एकूण मिळून 701 किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांचा समावेश आहे. टप्‍पा 1 मधील 75 टक्‍के कामे आणि टप्‍पा 2 मधील 50 टक्‍के कामे दिनांक 31 मे 2025 पूर्वी पूर्ण करण्‍याचे नियोजन आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते कामांचा अलीकडे म्‍हणजे दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी आढावा घेतला. अधिकारी, कंत्राटदार आणि  गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन रस्‍ते कामांना अधिक गती देण्‍याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये, यासाठी दिनांक 22 फेब्रुवारी 2025 नंतर कोणत्याही नवीन रस्त्यांचे खोदकाम करण्‍यास मनाई करण्यात आली आहे. सर्व रस्ते कामे व त्या संबंधित कामे देखील दिनांक 31 मे 2025 पूर्वी पूर्ण करण्याचे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्‍तांनी दिले आहेत.


सर्व परिमंडळ उप आयुक्‍त, विभागीय सहायक आयुक्‍त, प्रमुख अभियंता (रस्‍ते व वाहतूक), प्रमुख अभियंता (पूल), प्रमुख अभियंता (पर्जन्‍य जलवाहिन्‍या), जल अभियंता, नगर अभियंता, प्रमुख अभियंता (मलनिस्‍सारण प्रचालन), प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्‍प), प्रमुख अभियंता (विकास नियोजन) आदी खात्यांनी या निर्देशांचे पालन करावे, असे महानगरपालिका आयुक्‍तांनी स्पष्ट केले आहे. 


दुय्यम अभियंता संवर्गाची ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलली


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अभियांत्रिकी संवर्गातील एकूण ६९० रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता घेण्यात येणा-या ऑनलाईन परीक्षांचा कालावधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला आहे. यातील, दुय्यम अभियंता (स्थापत्य) या संवर्गाची दिनांक ९ मार्च २०२५ रोजी घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.


ही परीक्षा अंदाजे १५ दिवसाच्या आत घेण्याचे नियोजित आहे. त्याअनुषंगाने सदर परीक्षेचा सुधारित दिनांक निश्चित झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर व वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात येईल. सर्व संबंधित उमेदवारांनी याची कृपया नोंद घ्यावी, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.


हे ही वाचा