Maharashtra Chitrarath 2025 नवी दिल्ली : : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या झोळीत मतांचे भरभरून दान टाकणार्‍या महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनात परवानगी मिळालेली नाही. 26 जानेवारी 2025 रोजी राजपथ म्हणजेच कर्तव्यपथावरील प्रतिष्ठेच्या संचलनासाठी यंदा 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आले. या यादीत महाराष्ट्राला तूर्तास स्थान मिळालेले नसल्याचं समोर आलं आहे.


मात्र आतापर्यंत म्हणजे 1971 पासून ते 2023 पर्यंत महाराष्ट्राला 14 वेळा उत्कृष्ट चित्ररथासाठी पारितोषिक मिळाले आहे. आतापर्यंत एकूण 7 वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिले पारितोषिक, तर 4 वेळेस दुसरे पारितोषिक आणि 2 वेळेस तृतीय पारितोषिक मिळाले आहे. एकदा लोकप्रिय चित्ररथ यामध्ये पहिले पारितोषिक मिळाले आहे. सलग तीन वर्षी सर्वोत्तम चित्ररथाचे पहिले पारितोषिक पटकविण्याचा विक्रमही (हॅटट्रिक) राज्याच्या नावावर जमा आहे. अशातच या वर्षी या यादीत महाराष्ट्राला तूर्तास स्थान मिळालेले नसल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या आहे. 


1971 पासून महाराष्ट्राच्या चित्ररथाला 14 वेळा पारितोषिक, सात वेळा पहिला पुरस्कार


सर्वप्रथम 1981 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाच्या चित्ररथास प्रथम पारितोषिक मिळाले. 1983 मध्ये बैलपोळा या चित्ररथासही प्रथम पारितोषिक मिळाले. यानंतर 1986 मध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महाराष्ट्राचे योगदान या संकल्पनेवर आधारित चित्ररथास दुसरे पारितोषिक, तर 1988 मध्ये लोकमान्य टिळकांचा ऐतिहासिक खटला या संकल्पनेवर आधारित चित्ररथास दुसरे पारितोषिक मिळाले. यानंतर 1993 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरु केलल्या सार्वजनिक गणेश उत्सवाचे शताब्दी वर्ष या चित्ररथास पहिले पारितोषिक, तर 1994 मध्ये हापूस आंबा या चित्ररथासही पहिले पारितोषिक मिळाले. 1995 मध्ये बापू स्मृती या चित्ररथासही पहिले पारितोषिक मिळाले आणि सलग तीन वर्षे चित्ररथास पुरस्कार मिळवून महाराष्ट्राने पारितोषिकांवर आपली आघाडी सिध्द केली आहे.


2007 मध्ये जेजुरीचा खंडेराया या चित्ररथास तिसरे पारितोषिक, तर 2009 मध्ये धनगर या चित्ररथास दुसरे पारितोषिक मिळाले. 2015 मध्ये "पंढरीची वारी" या चित्ररथास पहिले पारितोषिक, तर 2017 मध्ये लोकमान्य गंगाधर टिळक यांनी दिलेल्या ‘स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे’ या घोषणेचा शताब्दी महोत्सव तसेच सार्वजनिक गणेशोत्सव अभियानाची 125 वर्षे या चित्ररथास तृतीय पारितोषिक मिळाले. 2018 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा या चित्ररथास प्रथम पारितोषिक मिळाले, तर २०२२ मध्ये महाराष्ट्राची जैवविविधता व राज्य मानके या चित्ररथास सर्वात लोकप्रिय चित्ररथाचे पहिले पारितोषिक मिळाले. आता 2023 मध्ये "महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती" या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसरे पारितोषिक मिळाले आहे.


सन 2024 या वर्षाच्या प्रजासत्ताक दिन नवी दिल्ली चित्ररथ संचलनात 28 राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी या दोन संकल्पनांवरती विविध राज्यांना आपल्या चित्ररथाच्या संकल्पना सादर करण्यास केंद्र शासनाने कळविले होते. यास अनुसरून विविध विषयांवर केंद्र शासनास संकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे 350 वे शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त शिवराज्याभिषेकाचा 350 वा महोत्सव आणि लोकशाहीची प्रेरणा या विषयांची सांगड घालून "लोकशाहीचे प्रेरणास्थान: छत्रपती शिवाजी महाराज" या संकल्पनेवर आधारित सादरीकरण संरक्षण मंत्रालयास करण्यात आले होते.


हे ही वाचा