chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलात 21 कोटी 59 लाख 38 हजार 287 रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बँक खात्यातील ही रक्कम दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वतःच्या खात्यांत वळती करून हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीनंतर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.


कसा केला घोटाळा?


या प्रकरणातील मुख्य आरोपी क्षीरसागर याने क्रीडा उपसंचालकांच्या नावाचा आणि स्वाक्षरीचा बनावट वापर केला. त्याने बँकेला बनावट मजकुराचे पत्र पाठवून बँक खात्याला स्वतःचा मोबाइल क्रमांक जोडला. मोबाईल नंबर जोडल्यानंतर नेट बँकिंगची सुविधा सुरू करून खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे स्वतःच्या खात्यात ट्रान्स्फर केले. हा संपूर्ण प्रकार होत असताना क्रीडा उपसंचालक आणि बँकेतील अधिकाऱ्यांना याची जाणीव कशी झाली नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. इतक्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारानंतरही क्रीडा संकुलाच्या उपसंचालकांना किंवा बँकेतील जबाबदार अधिकाऱ्यांना याचा पत्ता कसा लागला नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच, आयकर विभागाकडूनही कोणतीही नोटीस न आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून आणखी माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घोटाळ्यात इतर कोणी सहभागी आहेत का, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. सरकारी निधीवर असे दुरुपयोग होणे ही गंभीर बाब असून, दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


चोरट्यांपासून गायीही सुरक्षित नाहीत!


पैठण शहरात घरासमोर बांधलेली एक गाय चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील पन्नालाल नगर येथे रवी बोर्डे यांच्या घरासमोर त्यांची गाय बांधलेली होती. चोरट्यांनी ही गाय चोरून नेली. सकाळी गाय नसल्याने बोर्डे यांनी पैठण पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी कैद झाली असून, पोलिसांनी त्याआधारे आरोपी हसन कुरेशी आणखी एक अनोळखी अशा दोन जणांवर गुन्हा दाखल केलाय. मात्र, घरासमोर बांधलेल्या गायी देखील चोरट्यांपासून सुरक्षित नसल्याचे या घटनेतून समोर आले आहे.


हेही वाचा:


Sharad Pawar: सोमनाथ सूर्यवंशींच्या आईची शरद पवारांकडे आर्त हाक; भेटीनंतर म्हणाले, 'मुलगा जाणे हे दुःख कमी नाही....'