नवी मुंबई : दिवाळीच्या आधी गगनाला भिडलेले डाळींचे भाव आता 30 रुपयांनी कमी झाले आहेत. परदेशातून आयात वाढल्याने याचा परिणाम डाळींच्या किंमतीवर झाला आहे. रोजच्या जेवणातील महत्वाचा घटक असलेल्या डाळींच्या किंमती कमी होऊ लागल्याने महागाई कमी होण्यास मदत झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळू लागला आहे. सध्यातरी परदेशातील आयातीमुळे भाव कमी झाले असले तरी येणाऱ्या एक दीड महिन्यात महाराष्ट्रमधील डाळींचे पिक हातात आल्यावर अजून किंमती कमी होण्यास मदत होणार आहे.
मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोना संकटामुळे लॉकडाऊन सुरू झाला असतानाच राज्यात मोठ्या प्रमाणात पडलेल्या आवकाळी पावसाचा फटका शेतपिकांना बसला आहे. लॉकडाऊन आणि कोरोना असा दुहेरी संकटाचा परिणाम झाल्याने डाळींच्या किंमती गेल्या महिन्यात गगनाला भिडल्या होत्या. तूर डाळ 130 रुपायांच्या वर गेल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातील महत्वाचा घटक असलेल्या डाळी नाहिशा झाल्या होत्या. डाळींचे भाव गगनाला भिडल्याने ऐन दसरा –दिवाळीमध्ये महागाईने तोंड वर काढले होते.
मात्र आता दिवाळीनंतर डाळींची आवक वाढल्याने किंमती कमी होण्यास मदत झाली आहे. गेल्या काही दिवसात परदेशातून डाळींची आयात वाढल्याने किंमती आवाक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. लॉकडाऊन उघडला गेल्याने परदेशातील ब्राजिल, मलेशिया, कॅनडा, आफ्रिका, इस्राईलमधून डाळींची आवक वाढली आहे. 15 दिवसापूर्वी तूरडाळ 130 रुपयांवर होती ती आता 90 रुपयांच्या खाली आली आहे. हीच परिस्थिती मूग, मसूर, उडीत, चना डाळींची झाली आहे. पुढील एक ते दीड महिन्यात महाराष्ट्रामधील डाळींचे नवीन पिक येणार असल्याने किंमती अजून कमी होणार असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले आहे.
डाळी | 15 दिवसांपूर्वीचे दर | सद्याचे दर (प्रति किलो) |
तूर डाळ | 130-135 | 85-90 |
चना डाळ | 80-85 | 60-65 |
मूग डाळ | 120-125 | 80-85 |
मसूर डाळ | 75-80 | 60-65 |
उडीत डाळ | 120-125 | 85-90 |
Maharashtra Cabinet Meeting | वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळात चर्चा होणार?