Uddhav Thackeray Barsu Tour : "लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी होऊ देणार नाही. रिफायनरीचं समर्थन करुन दाखवाच, असं आव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यकर्त्यांना दिलं आहे. उद्धव ठाकरे आज बारसू (Barsu) दौऱ्यावर आहेत. राजापूरमध्ये पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सोलगावात (Solgaon) रिफायनरी विरोधकांसोबत संवाद साधला. यावेळी स्थानिकांचा विरोध असल्यास रिफायनरी होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सोलगावातील नागरिकांनी यावेळी रिफायनरी विरोधात घोषणाबाजी देखील केली. 


'होय, इथे माझ्या नातेवाईकांच्या जमिनी, तुम्ही माझे नातेवाईक आहात'


"मधल्या काळात आपलं सरकार होतं, त्याआधी नाणार प्रकल्प जोर लावून रद्द करुन घेतला. मग मी मुख्यमंत्री झालो, त्यानंतर माझ्यावर आरोप झाले की मला कोकणचा विकास नको, मला कोकण कंगाल करायचा आहे. कोणत्याही परिस्थितीत हे पाप माझ्या डोक्यावर नको होतं. उद्धव ठाकरेंच्या नातेवाईकांच्या इथे जमिनी आहेत, असा माझ्यावर आरोप होतो. पण हे खरंय तुम्ही माझे नातेवाईक आहात," असं उद्धव ठाकरे म्हणाले.


'मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही'


उद्धव ठाकरे म्हणाले की, "रिफायनरीसाठी लोकांची डोकी फोडण्याचा डाव आहे. मात्र मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही. हुकूमशाहीचा विचार केला तर हुकूमशाही मोडून काढू." तसंच "मन की बात करायला आलो नाही, जन की बात ऐकायला आलोय," असा टोलाही त्यांनी लगावला.


बारसूबाबत पत्र का दिलं? उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण


रिफानरीसाठी बारसूबाबत पत्र का दिलं याचं कारण देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले की, "इथे ओसाड जमीन आहे, वस्ती कमी आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीने ठराव केलाय की इथे रिफायनरी चालेल. तिथल्या लोकांना मान्य असेल म्हणून रिफायनरी कंपनीला प्राथमिक पत्र लिहिलं. मी पत्रात असं लिहिलंय का की लोकांची डोकी फोडली तरी चालतील, गोळ्या घातल्या तरी चालतील, अश्रुधूर सोडले तरी चालतील, भिकारी झाले तरी चालतील पण रिफायनरी करा. मी असंच म्हटलं होतं की, जर रिफायनरी येत असेल तर इथल्या लोकांना नेमकं काय आहे ते दाखवा. 


कातळशिल्पाची जागा रिफायनरी प्रकल्पात येते हे अलिकडेच समजलं


यानंतर उद्धव ठाकरे यांनी कातळशिल्पांची माहिती दिली. या कातळशिल्पाची जागतिक वारसा म्हणून नोंद व्हावी यासाठी पत्र लिहिलं होतं. परंतु या कातळशिल्पांची जागा प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पात जाणार हे मला अलिकडेच समजलं. इतर गोष्टी मी पत्रकार परिषदेत बोलेन, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.