रत्नागिरी : गेल्या दोन दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस पाहता रत्नागिरी (Ratnagiri Rain News) जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी (15 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयांचा समावेश असून त्या संबंधीचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जारी केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशात म्हटले आहे, प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरुन जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून प्रदान करण्यात आले आहेत. आपती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.
जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली (Ratnagiri jagbudi River)
हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. चिपळूण येथील वाशिष्ठी नदी, राजापूर येथील कोदवली नदी, लांजा येथील मुचकुंदी नदी यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जारी करण्यात आली आहे.
रत्नागिरीत अनेक गावांत सतर्कतेचा इशारा
रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात कोंड, आंबेड-डिंगणी- कर्जुवे, धामणी, कसबा, फणसवणे भागात जिल्हा परिषदेच्या रस्त्यावर पाणी भरलंय. त्यामुळे या भागांमधली वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरीतील खेड-दिवाणखवटी येथे नदीला पूर आला असून सात गावांचा संपर्क तुटला आहे. गणेशवाडीतील सात वाड्यांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
ही बातमी वाचा: