Ratnagiri Crime : रत्नागिरी जिल्ह्यातील देवळे येथील रत्नागिरी-कोल्हापूर हायवेवरील दाभोळे (Dabhole) येथील हॉटेल परमेश्वर आणि इतर दोन ठिकाणच्या दुकानात एकाच रात्री चोरी (Robbery) झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात एका महिन्यात सहा ठिकाणी चोऱ्या झाल्याचे सांगितले जात आहे. दाभोळे येथील हॉटेल परमेश्वरच्या छतावर जाऊन चोराने दोन पत्रे काढून आतमध्ये प्रवेश केला. पहिला पत्रा काढून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु खाली उतरता न आल्याने दुसऱ्या बाजूचा पत्रा काढून छपरावरुन आत प्रवेश केला. परंतु इथेही त्याला खाली उतरता येत नसल्याने लोंबकळत लोखंडी कैचीचा आधार घेतला. मग कैचीवरुन खाली टेबलावर उडी मारुन गल्ल्याच्या ड्रॉवरपर्यंत पोहोचला. त्यानंतर ड्रॉवरमधील अडीच हजार रुपये घेऊन हॉटेलच्या मागच्या दरवाजाने पोबारा केला.
याबाबत हॉटेल मालक कृष्णा आत्माराम सकपाळ, हॉटेल चालवणारे संजय बावकर यांनी पोलीस पाटील यशवंत सुकम यांना माहिती दिली. पोलीस पाटील सुकम यांनी त्वरित साखरपा पोलिसांशी संपर्क साधला. साखरपा पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव हेड कॉन्स्टेबल विशाखा कदम पोलीस कॉन्स्टेबल वैभव नटे त्वरित घटनास्थळी दाखल झाले त्यांनी रत्नागिरी येथे संपर्क साधून डॉग स्कॉड यांना पाचारण केले राणी डॉग यांच्या सह हेड कॉन्स्टेबल राणे घटनास्थळी हजर झाले. तसेच ठसे तज्ञ अक्षय कांबळे हे देखील घटनास्थळी हजर झाले.
दोन दुकाने चोरट्यांनी फोडले
दाभोळे येथील हॉटेल परमेश्वरसह परडेवाडी येथील नरेश कृष्णा सकपाळ यांचे टपरी वजा दुकान देखील फोडले. यातील एक हजार रुपये चोराने नेले. तसेच या ठिकाणचे प्रकाश सोमा रेवाळे यांचे दुकान फोडले. मात्र यांचे किती रुपये गेले हे समजू शकलेलं नाही. चोर चोरी करताना रोख रक्कमच लंपास करत असल्याचे निदर्शनास येत आहे. इतर वस्तू नेत नसल्याचे बोललं जात आहे. कोंडगाव आणि मेढे यांच्या सीमेवरील रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरीलच यश बियर शॉपी देखील फोडली. या शॉपीमधील 7000 रुपयांची चोरी झाल्याचे पोलिसांकडून समजले.
दाभोळेमध्ये एका महिन्यात सहा ठिकाणी चोरी
दाभोळे परिसरात एका महिन्यात सहा ठिकाणी चोरी झाल्याचे म्हटले जात आहे. दीड महिन्यापूर्वी सुवारे ऑटोमोबाईल या ठिकाणीही चोरी झाली होती. यावेळी चोराने इतर कोणतीही वस्तू न चोरता 250 रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. एकूणच दाभोळे परिसरात होणाऱ्या चोरीबाबत एक निष्कर्ष काढता येतो. चोर फक्त रोख रक्कम चोरत असून इतर कोणतेही सामाना चोरी करत नाही. या चोरीबाबत साखरपा पोलीस ठसे तज्ञ, डॉग स्क्वॉड घटनास्थळी चोराचा तपास लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र या घटनांमुळे दाभोळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा
Ratnagiri Crime : रत्नागिरीत चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असं गँगवॉर; तरूणावर तलवारीचे सपासप वार