कोकण: कोकणात शिवसेना ठाकरे गटाला लवकरच एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, असं असताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार किरण सामंतांच्या विधानानं चर्चांना उधाण आलं आहे. राजन साळवी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा आहे. मात्र, राजन साळवींना एकनाथ शिंदे प्रवेश देतील असं वाटत नाही, असं मोठं विधान किरण सामंतांनी केलं आहे. तर आपल्याला आणि उदय सामंतांना विश्वासात घेऊनच एकनाथ शिंदे राजन साळवींना प्रवेश देतील असं सामंत म्हणालेत. त्यामुळे पक्षप्रवेशाच्या चर्चेतच साळवींच्या नावाला विरोध सुरु असल्याचं एका अर्थानं दिसून येतंय. साळवींचा सहज पक्षप्रवेश सध्या कठीण झाल्याच्या चर्चा आहेत. तर दुसरीकडे 13 फेब्रुवारीला राजन साळवींचा पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.
13 फेब्रुवारीला राजन साळवींचा पक्षप्रवेश
राजन साळवी यांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतला पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती समोर आली आहे 13 फेब्रुवारीला राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे हा पक्षप्रवेश लांबला होता त्यानंतर आता अखेर 13 फेब्रुवारी चा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. राजन साळवी पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोकणाकडून मुंबईकडे रवाना होत आहेत.
माध्यमांशी बोलताना किरण सामंत काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना किरण सामंत म्हणाले, राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते आणि आहेत. परंतु, मला असं वाटत नाही. एकनाथ शिंदे यांना पटकन पक्ष्यांमध्ये घेतील किंवा पक्षांमध्ये एखादी विधान परिषदेची जागा देतील. ही पूर्णपणे अफवा आहे. असे निर्णय घेताना मला उदय सामंत यांना एकनाथ शिंदे नक्कीच विचारात घेतील अशी मला खात्री आहे, असं किरण सामंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पक्षप्रवेशाच्या चर्चेमध्ये साळवीच्या नावाला विरोध सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात दिसून येत आहेत.
उदय सामंत काय म्हणाले?
सामंत बंधूंचा राजन साळवी यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाला विरोध नसल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. विधानसभा निवडणुकीत किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा पराभव केला आहे. त्याच्या जवळचे सर्व कार्यकर्ते शिवसेना पक्षात आले आहे व येत आहे. त्यामुळे राजन साळवी यांना पक्षात घेतांना एकनाथ शिंदे सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतील असे उदय सामंत म्हणाले आहेत.
उदय सामंत साळवी यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले, अद्याप माझी याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झालेली नाही. आम्ही सविस्तर चर्चा करू त्यानंतर ते पक्षांमध्ये येत असताना त्यांच्या काय इच्छा आकांक्षा आहेत, त्याची चर्चा होणे गरजेचे आहे. माझे मोठे बंधू किरण सामंत त्या मतदारसंघात राजन साळवी यांचा पराभव करून निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांना देखील विश्वासात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे, या सर्व गोष्टींचा विचार झाल्यानंतरच एकनाथ शिंदे यांचा विचार करतील असं सामंत यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांचा 15 तारखेला माझ्या मतदारसंघात दौरा आहे त्यावेळी देखील काही पक्षप्रवेश पार पडणार आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.