Maharashtra Ratnagiri News : पक्षांच्या विष्ठेपासून रोपांची लागवड केली जाऊ शकते असं तुम्हाला कुणी सांगितलं तर सुरूवातीला तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण पक्षांच्या विष्ठेपासून रोपवाटिका म्हणजेच, झाडांची नर्सरी तयार करण्याचा अभिनव उपक्रम कोकणात राबवण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख यथे राहणाऱ्या आठल्ये-सप्रे पित्रे महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सह्याद्री संकल्प सोसायटी आणि सृष्टीज्ञान यांनी संयुक्तपणे हा प्रयोग यशस्वीपणे राबवला आहे.


उंच झाडाच्या डोलीत, आपल्या पिल्लांना भरवणारा... पांढरा आणि पिवळा असा आकर्षक रंग... शिवाय, डोक्यावरून उडाल्यानंतर जणू एखादं जेट विमान गेल्याचा भास निर्माण करणारा हा पक्षी म्हणजे, महाधनेश. तसं पाहायला गेलं तर हा पक्षी दुर्मिळच... पण, याच धनेश पक्षाच्या विष्ठेपासून रोपं, रोपवाटिका म्हणजेच, झाडांची नर्सरी तयार करण्याचा अभिनव उपक्रम कोकणात राबवण्या आला आहे.  


रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख या ठिकाणच्या आठल्ये-सप्रे महाविद्यालयाच्या प्राध्यापकांसह सह्याद्री संकल्प सोसायटी आणि सृष्टीज्ञान यांनी यासाठी आता पुढाकार घेतला आहे. मुख्य बाब म्हणजे, जंगलांतील काही महत्त्वाच्या झाडांवरील फळं हा पक्षी खातो. त्यामुळे पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाच्या, दुर्मिळ अशा जंगलातील झाडांची निर्मिती यातून होणार आहे.    




दरम्यान, हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी या टिमनं धनेश पक्षाची घरटी शोधली. त्यानंतर झाडांच्या मुळाशी पडणारी या पक्षांची विष्ठा गोळा केली. गोळा केलेल्या वाफे तयार केले गेले आहेत. त्या-त्या ठिकाणी पेरण्यात आली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्या वाफ्यांना वेळेत पाणी मिळेल याची काळजी घेतली.


धनेश हा पक्षी दुर्मिळ आहे. जंगलातील शेतकरी अशी देखील त्याची ओळख आहे. जवळपास 50 ते 60 वर्ष हा पक्षी जगतो. मुख्य बाब एकदा जोडीदार निवडल्यानंतर तो कायम एकाच नर किंवा मादीसोबत आयुष्यभर जोडीदार म्हणून राहतो. त्यामुळे त्याच्या आयुष्याची, प्रजननाची कथा देखील इंटरेस्टिंग अशीच आहे. मुख्य बाब म्हणजे, आठल्ये-सप्रे महाविद्यालयातील या टीमच्या जोडीला स्थानिक नागरिक देखील पुढाकार घेत धनेशच्या संवर्धनासाठी पुढाकार घेत आहेत. 


धनेशच्या किंवा कोणत्याही पक्षाच्या विष्ठेपासून रोपं निर्मितीचा हा प्रयोग राज्यातील पहिलाच असावा. ही बाब कौतुकास्पद आहेच. पण, त्याचवेळी आता आपण सर्वांनी या दुर्मिळ असलेल्या आणि हळूहळू नामशेष होत असलेल्या पक्षाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणं देखील गरजेचं असल्याचं एबीपी माझाशी बोलताना आठल्ये-सप्रे महाविद्यालयातील टीमनं सांगितलं. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Alphonso Mango : कोकणाच्या हापूसचा गोडवा सातासमुद्रापार, परदेशातून मागणी वाढली; शेतकऱ्यांना मिळतोय फायदा