Ratnagiri Dapoli Sai Resort: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सातत्याने लक्ष्य केलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट (Dapoli Sai Resort) प्रकरणी आता आणखी तापणार असल्याची चिन्हं आहेत. साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने थेट मुरुड ग्रामपंचायतीवर (ED at Murud Grampanchayat) धडक दिली असून काही कागदपत्रे ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे. इतकंच नव्हे तर ईडीने तत्कालीन सरपंच आणि सध्याचे सरपंच यांचीदेखील चौकशी केली आहे. त्यांना आता पुढील चौकशीसाठी मुंबईत बोलावण्यात आले आहे. सोमय्या यांच्या दाव्यानुसार, हे साई रिसॉर्ट शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या मालकीचे आहे. तर, अनिल परब यांनी याआधीच आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. 


रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील मुरुड या गावच्या किनाऱ्यावर 'साई रिसॉर्ट' उभारण्यात आले आहे. हे रिसॉर्ट उभारताना सीआरझेड कायद्याचं उल्लंघन झाले असून मनी लाँड्रिंगही करण्यात आली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. किरीट सोमय्या यांनी प्रतिकात्मक हातोडा घेत दापोलीमध्ये रॅली देखील काढली होती. या रिसॉर्टची मालकी परब यांची नसून आपली असून राजकारणात आपल्याला त्रास दिला जात असल्याचा दावा करत सदानंद कदम यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणाची हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. 


दरम्यान, या प्रकरणात आता आणखी एक नवीन ट्विस्ट आला आहे. ईडीने  मुरुड ग्रामपंचायतीमध्ये दाखल होत काही कागदपत्रे ताब्यात घेतले आहेत. शिवाय विद्यमान आणि तत्कालीन सरपंच यांची देखील चौकशी करत त्यांना मुंबईत बोलावल्याची माहिती सामोर आहे. मागील आठवड्यातच बुधवार आणि गुरुवारी ईडी मुरुड इथे दाखल झाली होती. त्यानंतर काही कागदपत्र घेत अधिकारी मुंबईत रवाना झाले. त्यामुळे आता विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी काहीच दिवसांपूर्वी सोमय्या यांनी दापोलीत येत  रिसॉर्ट तोडण्याचा दावा केला होता. पण सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्याबाबत कोणतीही कारवाई करता येणार नाही. अशा या घडामोडींमध्ये आता ईडीने काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.


यापूर्वी काय घडले आहे?


रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी असलेल्या वादग्रस्ताच्या शाहीर रिसॉर्ट प्रकरणात माजी परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनिल परब यांच्यासह आणखी दोघांविरोधात कलम 420 अंतर्गत दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शासनाचा महसूल बुडवत फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दापोलीच्या गटविकास अधिकारी रूपा दिघे यांनी दिलेल्या जबाबानुसार ही कारवाई केली गेली होती. 


कलम 420 अंतर्गत अनिल परब यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेले अनंत तुपे पण हे तत्कालीन सरपंच आहेत. तर, अनंत कोळी हे तत्कालीन ग्रामसेवक आहेत. गटविकास अधिकारी दिघे यांनी दिलेल्या जबाबामध्ये '' अनिल परब यांनी इमारत पूर्ण नसताना देखील 26 जून 2019 रोजी मालमत्ता कर आकारणीसाठी मुरुड ग्रामपंचायतीमध्ये अर्ज केला. त्यानंतर 14 नोव्हेंबर 2019 रोजी अर्जावर कार्यवाही करत कर आकारणी करण्यात आली. तसेच 02 मार्च 2020 रोजी अनिल परब यांनी वीज जोडणीसाठी दापोली महावितरणकडे अर्ज केला. त्यामुळे ग्रामपंचायत मुरुड आणि पर्यायांना शासनाचे देखील फसवणूक झालेली आहे. या संपूर्ण प्रकरणांमध्ये तत्कालीन ग्रामसेवक अनंत कोळी आणि तत्कालीन सरपंच अनंत तुपे यांनी इमारत पूर्णत्वास गेल्याची खात्री न करता कर आकारणी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे माझी त्यांच्या विरोध तक्रार आहे'' असं म्हटलं आहे. 


यावेळी गटविकास अधिकारी यांनी रूपा दिघे यांनी तक्रार करताना मुरुड ग्रामपंचायत, महावितरण यांना केलेले अर्ज, सोमय्या यांनी 29 मार्च 2019 आणि 29 नोव्हेंबर 2020 रोजीचे गुगल प्रो अर्थवरील फोटो देखील सादर केले आहेत. त्यानंतर आता अनिल परब यांच्या विरोधात 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.