लांजा : साखरपुड्याच्या दिवशीच घरातून न सांगता बाहेर पडलेल्या कौस्तुभ विजय कुरूप (वय 30, रा. लांजा) या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अणुस्कुरा घाटात त्याची कार सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळली असून, तो घटनास्थळीच मृत्युमुखी पडला. ही घटना बुधवारी (4 जून) पहाटे उघडकीस आली असून, त्यामुळे संपूर्ण लांजा परिसरात शोककळा पसरली आहे. कौस्तुभ आणि प्राजक्ता यांचा 3 जून रोजी साखरपुडा, तर 4 जून रोजी वैदिक पद्धतीने विवाह ठरलेला होता. विशेष म्हणजे, याआधीच दोघांचा नोंदणी विवाह 5 मे 2025 रोजी झाला होता, परंतु कौस्तुभच्या कुटुंबीयांना तो मान्य नव्हता. त्यामुळे विधीपूर्वक विवाहासाठी सर्व तयारी सुरू होती. मात्र, सोमवारी मध्यरात्रीनंतर कौस्तुभ कोणालाही न सांगता कार घेऊन घरातून निघून गेला.
त्याच दिवशी संध्याकाळी प्राजक्ता यांनी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी लांजा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. बुधवारी पहाटे घाटातून प्रवास करणाऱ्या एका नागरिकाला रस्त्यावर इंजिनाचा भाग दिसल्यामुळे त्याने तात्काळ अणुस्कुरा तपासणी नाक्यावर माहिती दिली. पोलिसांनी शोधमोहीम राबवून खाली उतरून पाहणी केली असता, चक्क एक कार दरीत उलटलेली आढळून आली. कार पूर्णपणे चुराडा झालेली होती आणि बाजूलाच कौस्तुभचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, कौस्तुभ कोल्हापूरहून लांजाकडे परतत असताना अणुस्कुरा घाटात अपघात झाल्याचा अंदाज आहे. मात्र, तो कोणालाही न सांगता घराबाहेर का निघून गेला, यामागचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही, या अपघातामागे अन्य कोणते कारण तर नाही ना? याचाही तपास पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे कौस्तुभच्या कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे. लग्नाच्या उत्साहाच्या जागी प्राजक्ता आणि कौस्तुभ यांच्या घरी शोककळा पसरली आहे.