मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यातील हायव्होल्टेज लढतींमध्ये समावेश असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. टीव्ही 9 पोलस्ट्राट आणि पीपल्स इनसाईट्स एक्झिट पोलच्या (Exit Poll 2024) अंदाजानुसार,रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) भाजपच्या नारायण राणे (Narayan Rane) यांची सरशी होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात त्यांच्यासमोर ठाकरे गटाच्या विनायक राऊत (Vinayak Raut) यांचे आव्हान होते. मात्र, नारायण राणे यांच्या पाठिशी भाजपची अजस्त्र यंत्रणा, शिंदे गटाच्या सामंत बंधूंची ताकद होती. तसेच नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कणकवलीत सभा घेतली होती. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात कोकणाच्या विकासासाठी नारायण राणे निवडून येणे, कसे महत्त्वाचे आहे, हे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्याचा फायदा नारायण राणे यांना होऊ शकतो.
तर ठाकरे गटाचे विनायक राऊत 2014 आणि 2019 असा दोनवेळेला रत्नागिरी-सिंधुदुर्गातून निवडून आले होते. त्यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सभा घेतल्या होत्या. मात्र, एक्झिट पोलच्या अंदाजानुसार विनायक राऊत यांचे तिसऱ्यांदा खासदार होण्याचे स्वप्न अधुरे राहण्याची शक्यता आहे.
नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. ते यापूर्वी राज्यसभेचे खासदार होते. मात्र, मोदी-शाहांनी त्यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवार न देता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. नारायण राणे यांनी पहिल्यांदाच रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या जागेसाठी शिंदे गटाचे उदय सामंतही इच्छूक होते. मात्र, भाजपने या जागेवरील दावा कायम ठेवल्याने त्यांना माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे निवडणुकीत सामंत बंधू नारायण राणे यांना किती साथ देईल, याबाबत संशय होता. मात्र, टीव्ही 9 पोलस्ट्राट आणि पीपल्स इनसाईट्स एक्झिट पोलची आकडेवारी पाहता रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणे यांचा विजय होण्याची शक्यता आहे.
एबीपी सी वोटर एक्झिट पोलचा निकाल
भाजप : 17शिंदे गट : 6अजित पवार गट : 1 ठाकरे गट : 9काँग्रेस : 8शरद पवार गट : 6
TV9 एक्झिट पोलचा निकाल
भाजप : 19शिंदे गट : 4अजित पवार गट : 0ठाकरे गट : 14काँग्रेस : 5शरद पवार गट : 6
आणखी वाचा
सांगलीत नो मशाल, ओन्ली 'विशाल', तीन पाटलांच्या लढतीत अपक्ष विशाल पाटील बाजी मारण्याचा अंदाज
महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष, दुसऱ्या नंबरवर ठाकरे गट; एक्झिट पोल काय सांगतो, पाहा