रत्नागिरी:  लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका वर्षभरावर आहेत. पुढील वर्षभरात या निवणुकांचे पडघम वाजतील असा अंदाज आहे. त्यापूर्वी आता सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, उमेदवारांबाबात चाचपणी केली जात आहे. सध्याच्या घडीला राज्यातील परिस्थिती पाहता भाजप सर्वाधिक लोकप्रतिनिधी निवडुन आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपनं शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच कोकणात लक्ष केंद्रीत केले आहे. 


दरम्यान, शनिवारी म्हणजेच 15 एप्रिल रोजी भाजपनं विजयी संकल्प मेळावा आयोजित केला आहे. रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर आणि राजापूर या ठिकाणाचे बुथ स्तरावरील कार्यकर्ते यावेळी सहभागी होणार आहेत. शिवाय, भाजपचे केंद्रातील मंत्री देखील लोकसभा प्रवास योजनेतंर्गत कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. राज्यात सर्वाधिक उमेदवार जिंकण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. त्याचवेळी आता भाजप कोकणातील आमदार आणि खासदार यांची संख्या वाढवत बालेकिल्ल्यातच शिवसेनेला धक्का देण्याची रणनिती आखत आहे. त्यानुसार रविंद्र चव्हाण यांच्याकडे आगामी निवडणुकांच्या तोंडावर पक्षबांधणी आणि रणनिती आखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.  भाजपमधील काही प्रमुख कार्यकर्ते आणि नेत्यांची या गोष्टीला 'एबीपी माझा'कडे दुजोरा व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप आणखी जोमानं आणि नियोजनबद्ध काम करणार असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. परिणामी कोकणातील मतदार कुणाला साथ देणार? याची चर्चा आणि उत्सुकता राजकारणात लागून राहिली आहे.   


फडणवीसांच्या विश्वासातील व्यक्ती


रविंद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहे . शिवाय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील देखील आहेत. आंगणेवाडी येथे भाजपची झालेली सभा यशस्वी करण्यामागे चव्हाण यांचा पडद्यामागून मोठा हात होता. त्यामुळे कोकणतील जबाबदारी रविंद्र चव्हाण यांच्याकडे आल्यास अगदी जुने - जाणते कार्यकर्ते देखील एकदिलानं काम करतील असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्याला महत्त्व आहे. यावेळी रविंद्र चव्हाण काय कानमंत्र देणार? याची चर्चा देखील आतापासून सुरू झाली आहे. 


सध्या भाजपची रत्नागिरी - सिंधुदुर्गमध्ये काय स्थिती? 


आमदार किंवा खासदारांच्याबाबत बोलायचे झाल्यास सध्या नितेश राणे यांच्या रूपानं भाजपचा एक आमदार आहे. पण, आगामी काळात ही संख्या वाढेल असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :