रत्नागिरी : बारसू रिफायनरीवरुन (Barsu Refinery) सध्या राजकारण चांगलंच तापलंय. बारसूवासियांसह ठाकरे गटानेही बारसू रिफायनरीला विरोध दर्शवला आहे. रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना भेटण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 6 मे ला बारसूचा दौरा करणार आहेत मात्र आता उद्धव ठाकरेंच्या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. ठाकरे गटाने रानतळे येथे सभेचे नियोजन केले होते
उद्धव ठाकरे उद्या शनिवारी आंदोलकांची भेट घेणार आहे. उद्धव ठाकरे यांना बारसू गावातील रिफायनरी विरोधकांना भेटण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने कुठल्याही प्रकारची सभा घेण्याची परवानगी नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रिफायनरी समर्थक देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून संमती पत्रे सादर करणार आहेत. रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू येथे माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आली असून या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांना उद्धव ठाकरे भेटणार आहेत.
राजापुरातील विविध 51 संघटना, ग्रामपंचायतीचे सरपंच, जमीन मालक, बागायतदार, व्यापारी असे हजारो समर्थक उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी नाणारसह बारसू परिसरातील शेतकरी, जमीनदार प्रकल्पासाठी जमिनीची संमतीपत्रे ठाकरे यांना सादर करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्याच्या दिवशी भाजप-शिवसेना शिंदे रिफायनरीच्या समर्थनात मोर्चा काढणार आहे. बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ महायुतीचा प्रत्युत्तर मोर्चा रत्नागिरी हेलिपॅडपासून सुरू होणार असल्याची चर्चा आहे. याच ठिकाणी उद्धव ठाकरे उतरणार असल्याचे म्हटले जात आहे.
ठाकरे गटाची यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचे
दरम्यान यासंदर्भात बुधवारी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी बारसूबाबत भूमिका स्पष्ट केली. प्रकल्प चांगला असेल तर स्थानिकांसमोर प्रकल्पाचं प्रेझेंटेशन द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. आता सभेची परवानगी नाकारल्यामुळे आता ठाकरे गटाची यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
संजय राऊतांनी परखड उत्तर दिलं
उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्यावरून आता राजकारण तापू लागलंय. काही जण बारसूमधील परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करतायेत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावर संजय राऊतांनी परखड उत्तर दिलं. बारसूमधले आंदोलक स्थानिकच आहेत, ते पाकिस्तानातून आलेले नाहीत असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Barsu Refinery: रिफायनरीच्या वादात आता नारायण राणे फ्रंटफूटवर; 6 मे रोजी बारसूमध्ये जाणार