Whale Fish Interesting Facts : आकाराने आणि वजनाने महाकाय असलेला व्हेल मासा (Whale Fish) खोल समुद्रात असतो. किनारपट्टी लगतच्या भागात व्हेल मासा सहसा आढळत नाही. मात्र, मागील काही काळात व्हेल मासा किनारपट्टी लगतच्या भागात आहे. त्यामुळे व्हेल मासा किनारपट्टी भागाकडे (Why Whale Fish Found at Beach Side) कसे येतात, त्यांची कारणे काय? याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. त्याबद्दल जाणून घ्या महत्त्वाची कारणे... 


व्हेल किनाऱ्याकडे कधी येऊ शकतात ? 


- व्हेल मासा जेव्हा बांगडा किंवा तारली, माकूळ  यांचा पाठलाग करत असतील तर ते किनाऱ्याकडे येऊ शकतात. असा पाठलाग करत असताना ओहोटी सुरु झाली तर ते किनाऱ्यावरील वाळूत अडकून पडू  शकतात.  त्यांच्या महाकाय शरीराचा भार ते पाण्यात असताना सहज पेलू शकतात. पण पाण्याबाहेर त्यांच्या वजनामुळेच त्यांची इंद्रिये दबली जातात.  त्यांची त्वचा सुकू लागली की त्याखालील चरबीच्या  थरामुळे  शरीरात खूप उष्णता निर्माण होते आणि अतिउष्णतेमुळे डिहायड्रेशन होऊन ते मृत होतात.  


- काही वेळेस खोल समुद्रात पोहताना कार्गो बोट किंवा प्रवासी बोट अथवा तेथे मासेमारी करणाऱ्या बोटीचा प्रॉप्लरचा पंखा लागून इजा झाल्यास आसरा घेण्यासाठी हे जलचर किनाऱ्याजवळ येतात. भरती ओहोटीच्या प्रवाहात अडकून परत समुद्राकडे परतण्याची शक्ती न राहिल्याने ते किनाऱ्यावर मृत होतात. 


- समुद्रात तेल शोधण्यासाठी किंवा मासे शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सोनार किंवा इकोसाऊंडर यंत्रणेच्या वापराने  अथवा बोटीच्या इंजिनांच्या आवाजाने डॉल्फिन्सच्या इकोलोकेशन प्रणालीत अडथळा येतो आणि ते कळपापासून भरकटतात. 


- ध्वनीची वारंवारिता आणि गती यांचाही या जलचरांच्या मेंदूवर परिणाम होतो. पाण्यात ध्वनीचा वेग 1500 मीटर प्रति सेकंद असतो. सोनार सिग्नल्सची वारंवारिता 5 ते 200 किलो हर्ट्झ असते. व्हेल्स एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वेगेवेगळ्या वारंवारितेचा उपयोग करतात. त्यांची क्षमता 150 किलो हर्ट्झच्या वरची असते. त्यामुळे त्या वारंवारितेचे इतर ध्वनी त्यांच्या ऐकण्याच्या प्रणालीत अडथळे आणतात. यामुळे ते आपल्या मार्गापासून भरकटू लागतात. 120 डेसीबल्स तीव्रतेचा ध्वनी त्यांना अस्वथ करतो. 170 डेसीबल्स ध्वनीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो आणि 220 डेसीबल्स तीव्रतेच्या ध्वनीमुळे त्यांचा  मृत्यू  होऊ शकतो. आपल्याकडे अजून ही पाण्याखालील ध्वनी प्रदूषणाबद्दल ठोस नियम नाहीत.  


- समुद्रात तरंगत असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा खाद्य समजून व्हेल्स  खातात. यामुळे श्वसनाला अडथळा येऊन, श्वास गुदमरून ते मरतात. 


- समुद्रात सोडलेल्या तेलाचा थर (ऑइल स्पिल्स ) त्यांच्या त्वचेवर आणि ब्लो होलवर जमा झाला तरी हे व्हेल्स  श्वास न घेता आल्याने मृत्युमुखी पडतात.   


- मासेमारी बोटींनी समुद्रात टाकून दिलेली जाळी (ज्याला घोस्ट फिशिंग म्हटले जाते ) हा एक मोठा समस्येचा विषय आहे. अशी जाळी समुद्रात खडक किंवा प्रवाळ यांना अडकून राहतात. त्यात अडकून ही व्हेल्स  श्वास घेण्यास वेळ येऊ न शकल्याने मृत होतात. 


- हवामानातील बदल या घटकाच्या परिणामी हे जलचर किनाऱ्याजवळ येऊन अडकून पडण्यास कारणीभूत होऊ शकतात. समुद्र पृष्ठभागाचे  वाढते तापमान व्हेल्सना  किनाऱ्याजवळ येण्यास भाग पडते. किनाऱ्याजवळ येऊन तेथे बोटींना धडकून  ही काही व्हेल्स मरण पावतात. 


- काही वेळा व्हेल्स आजारी असले किंवा त्यांना काही संसर्ग झाला असला किंवा म्हातारपण आले आणि मृत होण्याची जाणीव झाली 'तेरी ते आपल्या कळपापासून वेगळे होतात. असे मरणासन्न व्हेल्स लाटांबरोबर किनाऱ्याकडे येऊ शकतात.  


- गणपतीपुळे इथे आलेला हा व्हेल लहान आहे. तो कदाचित आईबरोबर किनाऱ्याकडे आला असावा आणि ओहोटीमुळे किनाऱ्यावर अडकला असावा. त्याच्या शरीरांतर्गत काही आजार किंवा संसर्ग होता की नाही हे कळू शकले नाही. 


>> गणपतीपुळे येथील बेबी व्हेल कसा जगला असावा?


- किनाऱ्यावर अडकून पडलेल्या व्हेलच्या पिल्लाला महत्वाचा धोका होता त्याच्या त्वचेखालील चरबीच्या थराचे तापमान पाण्याबाहेर प्रचंड वाढून, त्वचा सुकून जाण्याचा. यामुळे शरीराचे अंतर्गत तापमानही खूप वाढले असते आणि डिहायड्रेशन होऊन तो मृत झाला असता. पण त्याची त्वचा सतत पाणी टाकून ओली ठेवल्याने हा धोका कमी करता आला. 


- त्याला पशुवैद्यकीय डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक उपचारांचा उपयोग झाला असावा. 


- साधारणपणे तीन वर्ष हे पिल्लू आईच्या दुधावर वाढते. समुद्रात परत सोडल्यावरही त्याला त्याची आई भेटणे महत्वाचे आहे. बेबी व्हेल जन्माला आल्यानंतर लगेच दूध पिण्यास सुरुवात करते. बेबी व्हेलमधील natural instinct आणि गंध ज्ञान यामुळे, आपल्या  आईला दुधाची भूक लागल्यावर कोठे स्पर्श करायचा याचे उपजतच ज्ञान असते. आईमध्ये असणाऱ्या मॅमरी  स्लिट्स खाली असणाऱ्या स्तनाग्रांमधून दूध स्त्रवते आणि पिल्लाच्या तोंडाजवळ दूध फवारले जाते.  हे पाण्यामध्ये फवारले गेलेले दूध  पिल्लू पिते.