Ratan Tata Shantanu Naidu: द्रष्टा, दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रमी, नफा-तोटा न पाहणारे उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्यावर काल (11 ऑक्टोबर) वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकारण, उद्योग, कला, क्रीडा, समाजकारण यांच्यासोबतच सामान्य नागरिकांचा मोठा जनसागर उपस्थित होता.
रतन टाटा (Ratan Tata) यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांचा जीवलग मित्र म्हणून ओळख असलेला शांतनू नायडूने (Shantanu Naidu) सर्वांचं लक्ष वेधलं होतं. रतन टाटा यांचं पार्थिव गाडीतून घेऊन जात असताना शांतनू नायडू त्या गाडीच्या पुढे दुचाकी चालवत असल्याचं दिसला. हा प्रसंग पाहून सर्व भावूक झाल्याचे पाहायला मिळालं. आता वरळीत रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतरचा एक प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शांतनूच्या तीन शब्दाने संपूर्ण जमाव शांत-
रतन टाटा अनंतात विलीन झाल्यानंतर सगळे व्हीआयपी स्मशानभूमीबाहेर आले आणि बाहेर इतका वेळ रोखुन धरलेला जवळपास तीन-चारशेचा जमाव एकदम स्मशानभूमीत गेला. काहींनी आम्हांलाही अंत्यदर्शन हवं म्हणून पोलिसांसोबत थोडीशी हुज्जतही घातली. तेवढ्यात एक किरकोळ शरिरयष्टीचा मुलगा जमावाच्या नजरेस पडला...'शांतनू सर, शांतनू सर´ अशा हाका गेल्या. चेहरा उतरलेला तो बावीशी-पंचवीशीचा तरुण- शांतनू नायडू अतिशय शांतपणे जमावाला हात जोडून म्हणाला 'everything is over' केवळ या तीन शब्दांत जमाव शांत झाला आणि त्यातले काहीजण ओक्साबोक्शी रडू लागले.
'टॅक्सीसे जाते है, बाईक बाद में देखते है...'
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, शांतनू मान खाली घालून मीडियाला काहीच उत्तर न देता बाहेर आला. एकाही कॅमेराकडे शांतनूनं साधी नजरही फिरवली नाही. बाहेर येताच त्यानं आपली बाईक शोधायला सुरुवात केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर व्हीआयपी येत असल्यानं रस्त्यावरच्या सगळ्या गाड्या हटवल्या होत्या. त्यात शांतनूची बाईकही कुठेतरी गेली. शांतनू हळु आवाजात आपल्या सहकाऱ्याला म्हणाला, 'टॅक्सीसे जाते है, बाईक बाद में देखते है...', बाईक हरवलेल्या शांतनूला घेऊन जाण्यासाठी अनेक बड्या गाड्या तिथे दरवाजा उघडून तयार होत्या मात्र, तरीही शांतनूच्या तोंडून निघालं, 'टॅक्सी'से जाते है...स्मशानभूमीसमोरचा रस्ता बंद केल्यानं तिथे टॅक्सी येणार नव्हतीच. शेवटी कोणाच्यातरी खाजगी गाडीत मागच्या सीटवर तीन जणांमध्ये बसून शांतनू तिथुन गेला.
कोण आहे शांतनू नायडू? (Who is the shantanu naidu)
शांतनू याने अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. त्याचा जन्म 1993 मध्ये पुणे येथे झाला. खुद्द रतन टाटा यांनी फोन करुन, तू माझ्याबरोबर काम करणार का? अशी विचारणा शांतनूला केली होती. अनेकदा नवीन स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात सल्ले रतन टाटा शांतनूकडून घेतात, असेही सांगितले जाते. भटक्या श्वानांसाठी केलेल्या कामामुळे रतन टाटा यांची शांतनूसोबत जवळीक वाढली. शांतनूच्या कामाने टाटा खूप प्रभावित झाले होते. 2018 पासून रतन टाटा यांच्यासोबत शांतनू काम करत आहे. शांतनू नायडू याची गुडफेलोज ही कंपनी आहे. या कंपनीचा संस्थापक आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुविधा मिळवून देण्यासाठी ही कंपनी कार्यरत असते. गुडफेलोज या कंपनीचे मूल्य पाच कोटीपेक्षा जास्त आहे. यामध्ये रतन टाटा यांनीही गुंतवणूक केली आहे.