मुंबई : कर्ण शर्माच्या रेल्वे संघानं बलाढ्य मुंबईचा धुव्वा उडवून रणजी करंडकाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला. रेल्वेनं वानखेडेवर खेळवण्यात आलेल्या साखळी सामन्यात मुंबईवर दहा विकेट्सनी सनसनाटी विजय साजरा केला. रणजी करंडकाच्या आजवरच्या इतिहासात रेल्वेनं मुंबईवर मिळवलेला हा पहिलावहिला विजय ठरला. रेल्वेच्या या विजयाचं वैशिष्ट्य म्हणजे पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, शार्दूल ठाकूर अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवण्याचा पराक्रम गाजवला.
बडोद्याचा फडशा पण रेल्वेविरुद्ध शरणागती
मुंबईसाठी हा यंदाच्या मोसमातला दुसरा सामना होता. पहिल्या सामन्यात बडोद्याचा 309 धावांनी धुव्वा उडवल्यानंतर रेल्वेविरुद्ध मुंबईचा आत्मविश्वास दुणावलेला होता. पण ढगाळ वातावरणात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचं आमंत्रण मिळाल्यावर मुंबईच्या फलंदाजांची वानखेडेवर चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. सामन्याच्या पहिल्याच दिवशीच्या पहिल्याच सत्रात मुंबईचा अख्खा डाव 114 धावांत आटोपला. सलामीचा पृथ्वी शॉ 12 धावा काढून माघारी परतला. भरवशाच्या अजिंक्य रहाणेला रेल्वेच्या प्रदीप पूजरनं अवघ्या 5 धावांवर माघारी धाडलं. कर्णधार सूर्यकुमार यादवनं 39 धावांची खेळी करुन रेल्वेच्या तिखट माऱ्याचा प्रतिकार करण्याचा थोडाफार प्रयत्न केला. पण सूर्यकुमार 39 धावांवर बाद झाला आणि त्यानंतर मुंबईचा पहिला डाव पत्त्याप्रमाणे कोसळला. रेल्वेचा वेगवान गोलंदाज प्रदीप पूजरनं या डावात सहा तर अमित मिश्रानं तीन फलंदाजांना माघारी धाडलं.
कर्ण शर्माची कर्णधारास साजेशी खेळी
मुंबईला 114 धावांत गुंडाळल्यानंतर रेल्वेची आघाडीची फलंदाजीही लवकरच ढेपाळली. पहिल्या दिवसाअखेरीस रेल्वेचे पाच फलंदाज तबूत परतले होते. पण दुसऱ्या दिवशी कर्णधार कर्ण शर्मा आणि अनुभवी अरींदम घोषनं रेल्वेला ऐतिहासिक विजयाचं स्वप्नं दाखवलं. कर्ण शर्मानं कर्णधाराला साजेशी खेळी करत नाबाद 112 धावा फटकावल्या. तर घोषनं 72 धावांची खेळी केली. त्यामुळे पहिल्या डावात रेल्वेनं 266 धावा उभारुन 152 धावांची निर्णायक आघाडी घेतली. मुंबईकडून तुषार देशपांडेनं चार, दीपक शेट्टीनं तीन तर आकाश पारकरनं दोन विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या डावातही मुंबईची दैना
152 धावांनी पिछाडीवर असलेल्या मुंबईनं पहिल्या डावातला कित्ता दुसऱ्या डावातही गिरवला. या डावातही मुंबईच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. पृथ्वी शॉ पुन्हा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. तर रहाणेला दुसऱ्या डावातही दुहेरी आकडा गाठता आला नाही. पण सूर्यकुमार यादव याही वेळी तळपला. त्यानं 94 चेंडूत 65 धावांची खेळी साकारली. पण इतर फलंदाजांची साथ न लाभल्यानं दुसऱ्या डावातही मुंबईच्या धावफलकावर केवळ 198 धावाच जमा झाल्या. रेल्वेकडून हिमांशू सांगावननं मुंबईच्या 5 फलंदाजांना माघारी धाडलं. तर तर कर्ण शर्मा आणि प्रदीप पूजरनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
मुंबईनं दिलेलं अवघ्या 47 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या रेल्वेनं हे आव्हान एकही विकेट न गमावता तिसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रातच पार केलं. रेल्वेचे सलामीवीर मृणाल देवधर आणि प्रथम सिंगनं अभेद्य 47 धावांची सलामी दिली.
रेल्वेचा मुंबईवर पहिलाच विजय
रेल्वेनं रणजी करंडकाच्या आजवरच्या 86 वर्षांच्या इतिहासात एकदाही मुंबईला हरवण्याची किमया साधली नव्हती. पण अखेर वानखेडेवर त्यांनी हा पराक्रम गाजवला.
मुंबई वि. रेल्वे संघांमधली आजवरची कामगिरी
सामने – 14
मुंबई – 5
रेल्वे – 1
अनिर्णित – 8
या विजयासह रेल्वेनं या सामन्यात सात गुणांची कमाई केली. त्यामुळे रेल्वेच्या खात्यात तीन सामन्यांत एकूण 10 गुण जमा झाले आहेत. तर मुंबईच्या खात्यात दोन सामन्यांत सहा गुणांची नोंद आहे. मुंबईचा पुढचा सामना 3 ते 6 जानेवारीदरम्यान कर्नाटकविरुद्ध बीकेसीमध्ये खेळवण्यात येणार आहे.