कोल्हापूर : चित्रपटातली फायटिंग खऱ्या आयुष्यात झाली. तर जसं होईल अगदी तसंच चित्रपट महामंडळाच्या वार्षिक सभेत यावर्षीही झालं. कोल्हापुरातल्या लोकांना तसं या सभेतल्या राड्याचं नवल नसेलही. पण चित्रपट महामंडळाच्या सभेत घडलेल्या या प्रकाराची चर्चा होत आहे. विरोधकांनी जुनं प्रकरण उकरून काढलं. विनयभंगाच्या गुन्ह्याची तक्रार मागे घेतल्याशिवाय सभा सुरुच करु देणार नाही अशी धमकी माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी दिली. मात्र सत्ताधाऱ्यांनी सभा पुढे रेटली. त्यावरुन विरोधक पुन्हा भडकले आणि अध्यक्षांनी थेट लंचब्रेक घेतला.


जसं जेवण उरकलं तसा विरोधकांना पुन्हा चेव चढला. आणि मग कागदांची फेकाफेकी सुरु झाली. मग बिगबॉसचे राडाफेम सुशांत शेलार यांचाही धीर सुटला आणि तेही हमरीतुमरीवर उतरले. शेवटी तीन तासांच्या राड्यानंतर एकापाठोपाठ प्रस्ताव ठेवले. आणि एकच 'मंजूर मंजूर मंजूर' अशी घोषणा झाली.

सभेला सुरुवात होण्यापूर्वी अध्यक्षांच्या प्रास्ताविकाआधीच काही सभासदांनी हा गोंधळ घातला. यापैकी काही जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. वार्षिक कामांचा आणि भावी योजनांचा आढावा घेतल्यानंतर सभेचे अध्यक्ष, महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी जेवणाच्या विश्रांतीनंतर अर्ध्या तासाने सभा घेण्यात येईल अशी घोषणा केली. अद्याप केवळ एक वाजला असताना भोजनासाठी वेळ घालवण्यापेक्षा कामकाज पुढे सुरू ठेवावे, अशी घोषणाबाजी काही सभासदांनी केली. संचालक सुशांत शेलार यांनी नियमावलीप्रमाणे कामकाज होईल, असे सांगितले.

दरम्यान, राजेभोसले सभागृहातून भोजनकक्षाकडे जात असताना त्यांना सभासदांनी घेराव घातला. त्यांना सभा सुरू ठेवण्याचा एकच आग्रह केला. संचालक सतीश रणदिवे, अभिनेत्री संचालिका वर्षा उसगावकर यांच्यात चर्चा झाली. यावेळी सभासदांनी सभा सुरू करा अशा घोषणा सुरूच ठेवल्या त्यामुळे अखेर राजेभोसले पुन्हा मंचावर आले. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या सभासदांना खाली जाण्यास सांगितले. यानंतर सभा सुरू झाली.

वादाचे मूळ काय?

एका अभिनेत्रीने माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार केली होती. याप्रकरणी अष्टेकर यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. निकाल लागल्यावर गेल्या आठवडात अष्टेकर यांनी या प्रकाराविरोधात ती अभिनेत्री, अर्जुन नलवडे आणि सुरेंद्र पन्हाळकर यांच्या विरोधात 25 लाख रुपयांचा अब्रुनुकसानीच्या दाव्यासोबत फौजदारी गुन्हा नोंद केल्याचे सांगितले होते. विनयभंगाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर अष्टेकरांच्या अभिनंदनाचा तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी त्या तिघांच्या निषेधाचा फलक येथील महामंडळाच्या कार्यालयासमोर काहींनी लावला होता. अष्टेकर यांनीच हा फलक लावून महामंडळ कार्यकारिणीची बदनामी केली असे म्हणत त्यांना महामंडळाने नोटीस लागू केली. या नोटीस प्रकरणाचा जाब आणि त्यावरून महामंडळाने केलेली कारवाई यावरून आज सभेत वाद पेटला.