Mumbai:  त्रिभाषा धोरणाबाबतचा निर्णय रद्द केल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे 5 जुलै रोजी विजयी मेळावा साजरा करणार आहे . मुंबईतील वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा एकत्रित भव्य मेळावा होणार आहे . या मिळाव्याची राज्यभर चर्चा असताना मुंबईत दादर परिसरात विजयी मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेचे बॅनर झळकलेत . यात 'सरकारला नमवलं का ? तर हो नमवलं .. ! ' अशा आशयाची महायुतीच्या जखमेवर मीठ चोळणारी ठाकरे बंधूंची निमंत्रण पत्रिका मुंबईतील दादर परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे .  

आम्ही फक्त मेळाव्याच्या आयोजक आहोत .बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे .वाजत गाजत या .जल्लोषात गुलाल उधळत या .आम्ही वाट बघतोय ! अशा निमंत्रण पत्रिका व बॅनर्स ठाकरे बंधूंनी मुंबईत ठीक ठिकाणी लावल्याचे दिसत आहे .5 जुलै रोजी वरळी डोम येथे सकाळी दहा वाजता हा विजयी मेळावा पार पडणार आहे . या कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसणार आहेत .

'सरकारला नमवलं का ? तर हो नमवलं .. '

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उभाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक पत्रक काढत सर्वांना विजयी मेळाव्यात येण्याचे आवाहन केले आहे .  या निमंत्रण पत्रिकेच्या बॅनरवरचा मजकूर -

आवाज मराठीचा...असं म्हणत मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं..., कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं...आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या...आम्ही वाट बघतोय..., असं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. विशेष म्हणजे या पत्रकाच्या शेवटी पहिले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असं नावंही देण्यात आले आहे. 

 

दरम्यान ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांच्या संयुक्त विजयी मेळाव्याच्या निमित्ताने मुंबईत ठिकठिकाणी ठाकरे बंधूंचे बॅनर्स मनसैनिकांकडून आणि शिवसैनिकांकडून लावलेले पाहायला मिळत आहेत .

महाराष्ट्राची सुवर्ण पहाट 5 जुलै

"मराठी माणसाने एकजुट आणि एकत्र यावे हीच काळाची खरी गरज व आमची ताकद " अशा आशयाचे बॅनर वरळी, दादर, परळ, लालबाग, या भागात पाहायला मिळत आहेत .मराठी प्रेमी,ठाकरे प्रेमी परेश तेलंग यांनी हे बॅनर लावले असून या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे ,उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा एकत्र फोटो लावण्यात आला आहे.

ठाकरे बंधूंनी विजयीऐवजी पश्चाताप मेळावा आयोजित करावा: प्रतापराव जाधव

 येत्या काही दिवसात मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी मुंबईत विजयी मेळावा आयोजित केला आहे त्यांनी हा विजय मेळावा न घेता पश्चाताप मेळावा घ्यावा व त्यासाठी राज्यातील शिवसैनिकांना बोलवावं अशी टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे खरंतर जनभावनेचा आदर ठेवत मुख्यमंत्र्यांनी मराठी संबंधीचे दोन्ही जीआर मागे घेतले आहेत मात्र तरी पण ठाकरे बंधूंचा समाधान झालं नाही असेही प्रतापराव जाधव म्हणाले..