बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मीक कराड (Walmik Karad) याच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाल्मीक कराडचा जुना सहकारी विजयसिंह बांगर यांनी वाल्मीक कराडवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. माझ्यासमोर वाल्मीक कराडने तिघांना मारलं, त्याचा मी साक्षीदार आहे. महादेव मुंडेंना मारल्यानंतर वाल्मीक कराडच्या टेबलवर त्याचं कातडं, हाड आणि रक्त आणून ठेवलं होतं. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी तुला एका सरपंचाच्या खुनात अडकवणार अशी धमकी वाल्मीक कराडने दिली होती, असा आरोप विजयसिंह बांगर यांनी केला आहे. आपण यासंदर्भातील सर्व पुरावे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस अधिक्षकाकडे देणार असल्याचं देखील बांगर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. (Beed Crime News)
नेमकं काय म्हणाले बांगर?
वाल्मीक कराडचे जुने सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर हे त्याच्यापासून दूर झाल्यानंतर वाल्मीकने माझ्यासोबत काम कर असा हट्ट धरला होता. मात्र विजयसिंह बांगर यांनी त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता, त्यामुळे त्या दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली होती. यानंतर काल (बुधवारी) विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक खुलासे केले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीच तुला एका सरपंचाच्या खुनामध्ये अडकवणार अशी वाल्मिकने फोनवरून मला धमकी दिली होती ,असा दावा बांगर यांनी केला आहे. महादेव मुंडे यांना मारल्यानंतर वाल्मीक कराडच्या टेबलावर त्यांचं कातडं, हाड आणि रक्त आणून ठेवलं होतं. यानंतर वाल्मीक कराडने मारणाऱ्यांना शाबासकी दिली आणि गाड्याही गिफ्ट दिल्या, असा गौप्यस्फोट विजयसिंह बांगर यांनी केला आहे.
त्याचबरोबर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक कॉल रेकॉर्डिंग देखील ऐकवली, यामध्ये वाल्मीक कराड एका व्यक्तीला आता सगळ्यांचीच मदत घेतो तू कोण रे कुत्रा अशा प्रकारची भाषा वापरत जातीवाचक शिवीगाळ करतात. या कॉल रेकॉर्डिंग संदर्भात बांगर यांनी सांगितले, एका व्यक्तीने वाल्मीक कराडकडे कामासाठी 25 लाख रुपये दिले होते. मात्र तो परत देत नसल्याने वारंवार फोन केला होता त्याचा राग आला आणि यानंतर त्याने शिवीगाळ केली, तसेच त्याला बोलावून घेऊन पाच लाख रुपये दिले आणि खंडणीच्या गुन्ह्यात अडकवले. जसे मला एका खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मीक कराडनेच अडकवले होते, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.