Raj Thackeray Press conference: राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही जीआर महाराष्ट्र सरकारने रद्द केले किंवा त्यांना ते रद्द करायला भाग पाडलं. त्यासाठी मी महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेचे अभिनंदन करेन, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले. हिंदी सक्तीचे जीआर रद्द करण्यासाठी सर्व बाजूने रेटा आला. आम्ही याविरोधात 5 जुलैला मोर्चा काढणार होतो. हा मोर्चा निघाला असता तर तो न भूतो न भविष्यती अशा स्वरुपाचा झाला असता. आज ज्यांचे वय 70 ते 75 आहे, त्या लोकांना संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता, असे राज यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात वातावरण निर्माण झाले होते. मराठी माणूस एकटवला तर काय होते, हे सरकारला कळाले. सरकार आता पुन्हा असल्या भानगडीत पडणार नाही, ही अपेक्षा आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे माझ्याकडे आले होते तेव्हा ते म्हणत होते, तुम्ही आमचं ऐकून तर घ्या. मी त्यांना तेव्हाच सांगितलं की, 'मी ऐकून घेईन, पण ऐकणार नाही'. या विषयात तडजोड करणार नाही . हे एकप्रकारचं स्लो पॉयझनिंग आहे. हळूहळू एखादी गोष्ट पेरायची, असा हिंदी सक्तीचा विषय होता. त्यांनी हा प्रयत्न केला, पण त्यांच्या अंगाशी आला. आता जीआर मागे घेतला. आता सरकार समिती नेमणार आहे. समितीच्या निर्णयाशी आम्हाला देणंघेणं नाही, पण परत ही गोष्ट होणार नाही. आम्ही कोणतीही गोष्टी मान्य करणार नाही. आम्ही जे शिक्षण घेतलं त्यामध्ये पाचवीनंतर आणि सहावीनंतर संस्कृत, हिंदी होतं. मुळात हिंदी आणण्याचा प्रयत्न का, यांना येतं म्हणून का?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

Thackeray Brothers: ठाकरे बंधू एकत्र येणारच

राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेऊन ठाकरे बंधुंकडून 5 जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे प्रयोजन नष्ट केले होते. त्यामुळे राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली. याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, काल राज्य सरकारच्या निर्णयानंतर मला संजय राऊतांचा फोन आला. त्यांनी विचारलं, आपल्याला काय करायचं आहे? मी त्यांना म्हटलं की, मोर्चा तर रद्द करावा लागेल. त्यावर संजय राऊत म्हणाले की, विजयी मेळावा घेतला पाहिजे. मी त्याला होकार दिला. 5 तारखेला विजयी मेळावा घेऊयात, असेही बोललो. फक्त ठिकाण जाहीर नको करायला, असे मी संजय राऊतांना सांगितल्याचे राज यांनी म्हटले.

या विजयी मेळाव्याला पक्षीय लेबलं लावण्यात अर्थ नाही. हा मराठी माणसाचा विजय आहे. त्या दृष्टीकोनातून बघितलं पाहिजे. मात्र, मराठी प्रसारमाध्यमांनी आणि सगळ्यांनी हा विषय लावून धरला, याचा मनला आनंद आहे. अशाबाबतीत सर्वांनी जागृत असले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

आणखी वाचा

राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येण्याआधी सरकारने निर्णय रद्द केला; आदित्य ठाकरे म्हणाले, दोन भाऊ...