Maharashtra Monsoon Updates : राज्यभराला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. मुंबई, पुणे, सातारा सह कोकणात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. आता मुंबईत पुढचे तीन तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, सातारा पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सोमवारपासून पावसानं हजेरी लावली. त्यानंतर मंगळवारी सकाळपासूनही पावसाची रिपरिप सुरुच होती. गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे.


हवामान तज्ज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी पुढील तीन तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्वतला आहे. होसाळीकर यांनी सांगितलं आहे की, मुंबई, सातारा पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट  करत सांगितलं आहे की, 'मुंबई, ठाण्यात सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. ढगाळ आकाश आणि पश्चिम मध्य प्रदेशावरील प्रणालीचा परिणाम म्हणजे उत्तर कोकण बाजूच्या खालच्या पातळीवर पश्चिमेकडील भाग मजबूत होत आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.'






मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात


मुंबईला आज पहाटेपासून पावसानं झोडपलं आहे. मुंबईसह उपनगरांतही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली आहे. हिंदमाता परिसरात पाणी साचलं आहे. अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी परिसरात पावसाची हजेरी लागली आहे. मुंबईत पुढचे तीन तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


गोंदियामध्ये गंभीर पूरस्थिती


भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात 36 तासांपासून पावसाचा जोर कायम असून येथे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढा घातल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. भंडारा, गोंदियात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आमगाव इथून जाणाऱ्या नाल्यावर पाच फूट पाणी आल्यानं रस्ता बंद झाला आहे, पुरामुळे नागरिक अडकले आहेत. वैनगंगा नदीला पूर आला आहे.


भंडारा - गडचिरोली संपर्क तुटला



भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात झालेला मुसळधार पाऊस आणि गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे लाखांदूर तालुक्यातील वाहणाऱ्या चूलबंद नदीवरील सर्व पुल पुराच्या पाण्याखाली आले आहेत. यात लाखांदूर, भागडी चीचोली, मांढाल दांडेगावर, बोठली धरमापुरी, ताई बार्व्हा, दिघोरी मोठी पालांदुर पुलाचा समावेश असून प्रत्येक पूल पुराच्या पाण्याखाली आल्याने तालुक्यातील अनेक गावांची वाहतूक ठप्प झाली आहे, तर लाखांदूर ते वडसा या राष्ट्रीय महामार्गावरील चाप्राळ ते सोनी रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने भंडारा ते गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे. तर लाखांदूर तालुक्यातील आवली, पारसोडी,पाऊलाडवणा, या गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले असून पुराचा धोका वाढलेला आहे. चुलबंद नदीच्या पुलावर पुराचे पाणी चढल्याने पुल पाण्याखाली आले आहे. त्यामुळे लाखांदूर ते पवनी मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. गावाला पुराच्या पाण्याने वेढले असून अनेक घरे पाण्याखाली आले आहे. तालुका प्रशासन पूर परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.