रायगड : पाली खोपोली (Pali- Khopoli) राज्य महामार्गावर दापोडे हद्दीत एसटी बस व सेलेरो कारचा भीषण अपघात झाला आहे.एस टी बसचा रॉड तुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवीतहनी झाली नाही. मात्र काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. आज (मंगळवारी) हा अपघात घडला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एसटी बस कर्जत खोपोलीमार्गे माणगावकडे जात होती. तर सेलेरो कार पाली बाजूकडून खोपोलीकडे जात होती. हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बस विद्यार्थ्यांसहीत पलटी झाली. मागील काच फोडून 48 एनसीसी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात सेलेरो कारमधील डॉ. आयुष गायकवाड आणि विशाल पाटील जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पेण येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तात्काळ पाली पोलीस व स्थानिक नागरिकांकडून मदत कार्य सुरू आहे या आपघातात कारचं आणि बसचं मोठं नुकसान झालं आहे.
रायगडमध्ये बस दरीत कोसळली
रायगडमधील कोंझर घाटात एका बसाला अपघात झाला आहे. ही बस कोंझरवरून मुंबईच्या दिशेला जात असताना रस्त्याच्या बाजूला चिखलात घसरल्याने हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच कोंझर गावातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गाडीमधून अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बसमध्ये दहा महिला व 10 लहान मुले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. रस्त्यालगत गेलेल्या या जागेवर चिखल असल्याने गाडी फार दूर गेली नसल्याची माहिती आहे. झाडाचा आधार घेत बस चालकाने बस सुरक्षितपणे थांबवण्याचा प्रयत्न केला. बसमधील सर्वच प्रवाशांना सुखरूप गाडीतून बाहेर काढून रस्त्यावर आणण्यात आले आहे. स्थानिकांनी घाबरेल्या प्रवाशांना धीर दिला.
धुळे जिल्ह्यातील अपघातात 4 जणांचा मृत्यू
धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यात एक भीषण अपघाताची घटना घडली. येथील दसवेल फाट्याजवळ पिकअप व्हॅन आणि ईको गाडीची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की, यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. नरडाणा येथे भागवत कथेचा कार्यक्रम आटपून परतताना इको व्हॅनला दसवेल फाट्याजवळ भरधाव पिकपने त्यांच्या व्हॅनला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला.