रायगड: संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर पोस्ट करून रायगडावर उत्खनन सुरु असताना ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा पुरावा सापडल्याची माहिती दिली आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्याकडून सुरु असलेल्या उत्खनन कार्यात 'यंत्रराज' हे उपकरण सापडल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. 

Continues below advertisement

संभाजीराजे छत्रपती यांची पोस्ट

खगोलशत्रीय अभ्यास करून तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गराज रायगडाचे बांधकाम झाले होते, याबाबतचा महत्त्वपूर्ण पुरावा मिळून आला आहे. दुर्गराज रायगड येथे भारतीय पुरातत्त्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन प्रक्रियेमध्ये गडावर प्राचीन ‘यंत्रराज’ सौम्ययंत्र (Astrolabe) हे खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे.

प्राचीन कालखंडापासून ग्रहताऱ्यांच्या अभ्यासासाठी, दिशांचा वेध घेण्यासाठी तसेच वेळ मोजण्यासाठी वापरण्यात येणारे महत्वाचे यंत्र म्हणजे 'Astrolabe'. याला ‘यंत्रराज’ या नावानेही ओळखतात. अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त, विषुववृत्त यांसारख्या गोष्टींचा अभ्यास करणे सोपे व्हावे म्हणून या यंत्राचा वापर केला जात असे. दुर्गराज रायगडाचे बांधकाम करीत असताना खगोलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

भारतीय पुरातत्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयत्नांनी दुर्गराज रायगड येथे मागील काही वर्षांपासून  उत्खननाचे कार्य सुरू आहे. मागील तीन ते चार वर्षापासून गडाच्या विविध भागात जसे की, रोपवे अप्पर स्टेशन च्या मागील बाजूस ते कुशावर्त तलावापर्यंत व बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर या भागांमधे जे शिवकालीन वाड्यांचे अवशेष आहेत, अशा जवळपास १० ते १२ ठिकाणी हे उत्खनन पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने कुशावर्त तलावाच्या वरील भागात व पर्जन्यमापक आणि वाडेश्वर मंदिराच्या मधील भागात असलेल्या ऐतिहसिक वाड्याच्या जागेवर उत्खनन कार्य राबविले असता, त्याठिकाणीच हे प्राचीन यंत्रराज, सौम्ययंत्र (Astrolabe) खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे.

या यंत्रराजवर वरील बाजूस काही अक्षरे कोरलेली आहेत. मध्यभागी एक कासव/साप सदृश्य दोन प्राण्यांचे अंकन केलेले आहे. त्यांचे मुख आणि शेपटी कुठल्या दिशेला असावी, हे समजण्यासाठी वरील बाजूस मुख आणि पूंछ अशी अक्षरे सुद्धा कोरलेली आहेत. या वरून उत्तर आणि दक्षिण दिशा कुठे असावी, याचा अंदाज बांधणे सोपे जात असावे. या सापडलेल्या अमूल्य ठेवल्यामुळे इतिहास अभ्यासकांना पुढील संशोधनासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

इतर बातम्या

Pune NCP: पुण्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नवीन शहराध्यक्ष; मानकरांच्या राजीनामानंतर 'या' दोन नेत्यांना दिली संधी