रायगड : जिल्ह्यातील रेशनिंग लाभार्थ्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक असून तसं जर केलं नाही तर धान्य बंद करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा पुरवठा विभागाने एक पत्रक काढत याबाबत स्पष्ट केलं आहे.
जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्त भाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. आता रेशन धारक लाभार्थ्यांना 15 फेब्रुवारी पूर्वी आधार प्रमाणीकरण ई- केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा, ई-केवायसी न केलेल्या शिधापत्रिकाधारकांना 15 फेब्रुवारी नंतर धान्य दिले जाणार नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
रेशन धारक लाभार्थ्यांनी ई-केवायसी 15 फेब्रुवारीपर्यंत केली नाही तर अशा लाभार्थ्यांना धान्य दिले जाणार नाही. शिवाय यासंदर्भात सर्व लाभार्थी व रास्त भाव धान्य दुकानदारांना 15 फेब्रुवारी पूर्वी 100 टक्के कामकाज पूर्ण करण्याचे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
Raigad Ration Card e KYC : जिल्ह्यांत एकूण किती लाभार्थी?
- रायगड जिल्ह्यात एकूण 17 लाख 68 हजार 262 हे रास्त भाव शिधा लाभार्थी आहेत.
- त्यापैकी 9 लाख 95 हजार 692 लाभार्थी यांचे ई केवायसी आतापर्यंत पूर्ण झालेली आहेत.
- तर 7 लाख 72 हजार 570 लाभार्थ्यांचे ई केवायसी बाकी आहेत.
- या लाभार्थ्यांना 15 फेब्रुवारी पर्यंत ई केवायसी करणे बंधनकारक पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
ई केवायसी करताना कोणकोणते अडथळे?
काही ज्येष्ठ लाभार्थी यांचे मशीनवर हाताचे अंगठ्याच्या ठसे उमटत नाहीत.यासाठी पुरवठा विभागाने आय स्कॅनरची सुविधा गावोगावी पुरविण्याचे काम सुरू केले आहे.मात्र खेडोपाड्यात हा सर्व्हे पूर्ण करण्यासाठी रेशनिंग दुकानदारांनी आता कॅम्प घेणे सुरू केले आहे.
ही बातमी वाचा: