रायगड : सध्या रायगड या लोकसभा मतदारसंघाची (Raigad Lok Sabha) सगळीकडे चर्चा होत आहे. कारण या मतंदरासंघात सुनिल तटकरे (Sunil Tatkare) आणि अनंत गीते (Anant Geete) यांच्यात लढत होणार आहे. सुनिल तटकरे हे महायुतीचे उमेदवार आहेत. तर अनंत गीते हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. अनंत गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोणत्याही परिस्थितीत मी या निवडणुकीत तटकरे यांना पराभूत करणारच आहे, असा विश्वास गीते यांच्याकडून व्यक्त केला जातोय. मात्र अनंत गीते यांची एका वेगळ्याच कारणामुळे अडचण होण्याची शक्यता आहे. रायगड या मतदारसंघातून अनंत गीते नावाचे आणखी दोन उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. या दोन अपक्ष उमेदवारांच्या मदतीने गीते यांना थोपवण्याचा विरोधकांकडून प्रयत्न केला जातोय, असं बोललं जातंय. 


अनंत गीते नावाचे तीन उमेदवार


रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी एकूण पाच उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी तशी माहिती दिलीआहे. रायगड या मतदारसंघात निवडणुकीच्या तिसऱ्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. याच पाच उमेदवारांपैकी तीन उमेदवार हे अनंत गीते आहेत. यातील दोन अनंत गीते यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर अनंत गंगाराम गिते (1+ 3 अर्ज) यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी भरला आहे. या शिवाय नितीन जगन्नाथ मयेकर अपक्ष, आस्वाद जयदास पाटील यांनीदेखील आपले अर्ज भरले आहेत.


तटकरे झाले होते पराभूत


उमेदवारांच्या नावात साधर्म्य असल्यावर प्रमुख उमेदवाराला मोठा फटका बसतो. इतिहासात तशी काही उदाहरणेदेखील आहेत. याआधी 1991 साली शेकापचे उमेदवार दत्ता पाटील यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने आणखी एका दत्ता पाटलांना मैदानात उतरवलं होतं. त्याचा फटका दत्ता पाटील यांना बसला होता. हाच पॅटर्न 2014 साली वापरण्यात आला होता. या निवडणुकीत सुनील तटकरे यांना पराभूत करण्यासाठी सुनिल तकटकरे नावाच्या व्यक्तीला अपक्ष म्हणून मैदानात उतरवण्यात आलं होतं. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरेंना 2000 मतांनी पराभूत व्हावे लागले होते.  तर दुसरीकडे तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तीला एकूण 9 हजार 849 मते पडली होती.  


गीते यांना फटका बसणार?


अशीच खेळी आता अनंत गीते यांच्याविरोधात खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनंत गीते या नावाचे एकूण तीन उमेदवार रायगड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असुन यामध्ये दोन गीते हे अपक्ष आहेत. त्यामुळे अनंत गीते यांना मिळणारी मते चुकून अपक्ष उमेदवार असलेल्या दोन्ही अनंत गीतेंना पडल्यावर मतफुटी होण्याची शक्यता आहे. अनंत गीते यांना हा फटका बसणार का? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. 


हेही वाचा :


घोषणाबाजी, जल्लोष अन् कार्यकर्त्यांचा उत्साह! अनंत गीतेंनी भरला उमेदवारी अर्ज; तटकरेंना आव्हान!