Raigad Accident: रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. बसस्थानकावर थांबलेल्या एका महिलेला भरधाव कारने धक्का बसणार होता, ते पाहताच तिने तिला वाचवण्यासाठी स्वतःला धोक्यात टाकले. दुर्दैवीपणे, ती जागीच ठार झाली, तर दुसरी महिला वाचली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. म्हसळा पोलिसांनी घटनास्थळी तातडीने दाखल होऊन आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून तपास सुरु आहे.
नेमकं घडलं काय?
रस्ता ओलांडत असताना एका भरधाव कारने दोन महिलांना जोरदार धडक दिली. यामध्ये एक महिला दुसरीला वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःच मृत्यूमुखी पडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचं नाव किशोरी किसन जावळेकर (वय 42, रा. केलटे, ता. म्हसळा) असं आहे. तर थोडक्यात बचावलेल्या महिलेचं नाव प्राजक्ता प्रशांत गोगरकर (वय 42, व्यवसाय अंगणवाडी सेविका, रा. श्रीवर्धन तालुका) असं सांगितलं जातं.
माहेरून परतल्या अन् काळ आला
किशोरी जावळेकर गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोन दिवस माहेरी गेल्या होत्या. काल त्या एसटी बसने परत आपल्या गावाकडे येत होत्या. म्हसळा तालुक्यातील वाडंबा बसस्थानकावर त्या उतरल्या. त्याचवेळी अंगणवाडी सेविका प्राजक्ता गोगरकरही श्रीवर्धन येथून आलेल्या बसने त्या ठिकाणी उतरल्या. दोघी रस्ता ओलांडून पलिकडे जाण्यासाठी थांबल्या होत्या. यावेळी भरधाव वेगात कार (क्रमांक MH-03 BC-9462) त्या रस्त्याने येत होती. कार चालवणाऱ्याचं नाव सोहम संतोष पाटील (रा. माणगाव, रायगड, वय 21) असं आहे. कार वेगात आल्याने ती थेट प्राजक्ता गोगरकर यांच्याकडे धावून गेली. अपघात होणार हे लक्षात येताच किशोरी जावळेकर यांनी धैर्य दाखवत प्राजक्ताचा हात ओढून तिला बाजूला घेतलं. प्राजक्ता गोगरकर यांचा जीव वाचला, पण कारने किशोरी जावळेकर यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर त्यांना कार काही अंतर फरफटत नेत गेली. गंभीर दुखापत झाल्याने त्यांनी जागीच प्राण सोडले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
किशोरी जावळेकर यांचे पती काही वर्षांपूर्वीच वारले होते. त्यामुळे घराची जबाबदारी त्यांच्यावरच होती. आता त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठं संकट आलं आहे. या अपघाताची माहिती मिळताच म्हसळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघाताची नोंद करून आरोपी चालक सोहम पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.