Mumbai-Goa Highway Potholes : गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेश उत्सवात कोकणात (Konkan) जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. परंतु कोकणात जाताना चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावरुन (Mumbai-Goa Highway) खडतर प्रवास करावा लागतो. कारण रस्त्यावरील खड्डे (Potholes) आणि महामार्गाचं चौपदीकरण. परंतु कोकणात जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास कमी खडतर आणि सुखकर व्हावा यासाठी आता मुंबई-गोवा हायवेवरील डागडुजीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी, पेव्हर ब्लॉक, डांबरीकरण, हॉटमिक्सरच्या साहाय्याने खड्डे बुजवण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. 


'गणेशोत्सव' हा कोकणी चाकरमान्यांचा सर्वात मोठा उत्सव असून बहुतांश चाकरमानी हे या उत्सवाच्या निमित्ताने कोकणातील गावी हजेरी लावतात. परंतु, कोकणात जाणाऱ्या मुंबई-गोवा हायवेच्या मार्गाचे रुंदीकरणाचे काम आजही अपूर्ण असून महामार्गावर खड्डेच-खड्डे असल्याने वाहने चालवणं कठीण झालं आहे. यामुळे, रायगड जिल्ह्यातील काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत हे स्वखर्चाने आणि श्रमदान करुन खड्डे भरण्यासाठी जनआक्रोश आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे. 


दरम्यान, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 25 ऑगस्टपर्यंत मुंबई-गोवा हायवेवरील खड्डे तातडीने भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पळस्पे ते इंदापूर दरम्यानच्या मार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी सिमेंट काँक्रिट, डांबरीकरण, हॉटमिक्सरच्या साहाय्याने खड्डे बुजवण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. परंतु मुंबई-गोवा हायवेवरील खड्डे हे 25 ऑगस्टपर्यंत म्हणजे आजपर्यंत भरुन महामार्ग सुस्थितीत करणं कठीण असल्याचं स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे. यामुळे, कोकणात जाणाऱ्या मार्गावरचा प्रवास हा गणेशोत्सवापूर्वी सुरळीत होणार की खड्ड्यांतून, हे पाहणे गरजेचं आहे. 


Mumbai-Goa Highway वरील अवजड वाहतूक 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान बंद
गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागू नये यासाठी मुंबई-गोवा हायवेवरील अवजड वाहतूक ही बंद ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सवापूर्वी सुमारे आठवडाभरापासूनच मुंबई-गोवा हायवेवर वाहनांची वर्दळ सुरु असते. तर, वाहनांच्या वाढत्या संख्या आणि अवजड वाहनांमुळे अनेक वेळा तासनतास वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ज्या वाहनांची वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे अशी जड अवजड वाहनं, ज्यामध्ये ट्रक, मल्टी एक्सल, ट्रेलर इत्यादी वाहनांवर ही बंदी लागू असेल. तर अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या निर्बंधांमधून दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला आणि नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना वगळण्यात आलं आहे.