Raigad Crime News:  पेण येथील मुद्रांक विक्रेते आणि सेतू चालक हबीब खोत यांच्याकडे तीन लाख रुपये खंडणी प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शालोम पेणकर याला देखील पेण पोलिसांनी (Pen Police) अटक केली आहे. या सर्व आरोपींना पेण कोर्टात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 
   
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शालोम पेणकर व रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी अन्य साथीदारांसह पेण तहसीलदार कार्यालय येथे मुद्रांक विक्रेते हबीब खोत यांच्या विरोधात आंदोलन केले होते. मात्र शालोम पेणकर, संदीप ठाकूर यांनी मुद्रांक विक्रेता, माजी नगरसेवक हबीब खोत यांच्यावर दबाव टाकत त्यांना शहरातील राजू पोटे येथील मनसे कार्यालयात बोलवून खंडणीखोर आरोपी शालोम पेणकर, संदीप ठाकूर, रफिक तडवी व जनार्दन पाटील यांनी मुद्रांक विक्रीच्या व्यवसायाविरुद्ध यापुढे तक्रार न करण्यासाठी 10 लाख आणि तडजोडीअंती 3 लाख रुपये रोख, दरमहा 40 हजार रुपये खंडणी मागितली होती.


खंडणी न दिल्यास तुझा परवाना रद्द करण्याची आणि चाकूचा धाक दाखवून जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. शेवटी तडजोडीअंती दोन लाख रुपये रोख देण्याचा तोडगा निघाला. यानंतर 7 जुलै रोजी रात्रौ 8 वाजण्याच्या सुमारास आरोपी शालोम पेणकर, संदीप ठाकूर आपल्या अन्य साथीदारांसह पन्नास हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शालोम पेणकर, मनसेचा उप जिल्हाध्यक्ष आरोपी संदीप ठाकूर यांनी उर्वरित दीड लाख रुपयांची मागणी मंगळवार 11 जुलै रोजी केली असता फिर्यादी हबीब खोत यांनी पेणचे उप विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांच्याकडे तक्रार केली. 


यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डीवायएसपी शिवाजी फडतरे यांनी त्याच दिवशी सायंकाळी सापळा रचत दीड लाख रुपये घेताना संदीप ठाकूरसह त्याच्या साथीदाराला अटक केली. त्यावेळी शालोम पेणकर, रफिक तडवी यांनी तेथून पळ काढला होता. मात्र पेण पोलिसांनी त्याच दिवशी रात्रीच शालोम पेणकर व रफीक तडवी यांना अटक केली.


शालोम पेणकर, संदीप ठाकूरला 14 तारखेपर्यंत पोलिस कोठडी


या प्रकरणातील आरोपी महाराष्ट्र नवनिर्माण विदयार्थी सेनेचा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शालोम पेणकर याच्यासह मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर व इतर दोन साथीदारांना पेण कोर्टात हजर केले असता 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्याकडून 50 हजार रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत. याबाबत पुढील तपास पेण पोलीस करत आहेत.


पक्षातून हकालपट्टीची मागणी


शालोम पेणकर हा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदाचा गैरफायदा घेत होता. अनेक शासकीय कार्यालयात माहितीचा अधिकार अर्जाचा गैरवापर करुन अधिकारी वर्गा कडून लाखो रुपयांची खंडणी उकळत असल्याची चर्चा पेण शहरात सुरु आहे. ह्या खंडणीखोर नेत्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी शासकीय अधिकारी करीत आहेत.