Matheran E-Rickshaw :  मागील काही महिन्यांपासून माथेरानमध्ये सुरू असलेली ई-रिक्षाचे (Matheran E-Rickshaw) भवितव्य सध्या तरी अंधारात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रायोगिक तत्वावर ई-रिक्षा सेवा सुरू झाली होती. मात्र, त्याची मुदत आज संपणार आहे. उद्यापासून ई-रिक्षाबाबतचा कोणताही निर्णय समोर आला नाही. त्यामुळे ई-रिक्षाबाबत कोणतीही स्पष्टता नाही. याच्या परिणामी स्थानिकांसह पर्यटकही संभ्रमात आहेत. 


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माथेरानमध्ये 5 डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर ई-रिक्षा सुरू झाली आहे. फक्त 35 रुपयांत रहिवासी व पर्यटकांना, तर विद्यार्थ्यांना पाच रुपयांत दस्तुरी नाका टॅक्सी स्टैंड ते सेंट झेवियर स्कूल, वन ट्री हिलपर्यंत जाण्याची सोय झाली होती. स्वस्त आणि पर्यावरणपूरक ई-रिक्षामुळे स्थानिकांसह पर्यटकांना दिलासा मिळाला होता. या प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पाला आज, 4 मार्च रोजी तीन महिने पूर्ण झाली आहे. उद्या, 5 मार्चपासून ई-रिक्षा चालणार की बंद होणार, याबाबत स्पष्टता नसल्याने नागरिक व पर्यटकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. राज्य सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून यापुढेही ई-रिक्षा सुरू ठेवण्याची मागणी माथेरानकरांनी केली आहे.


ई रिक्षामुळे माथेरानच्या पर्यटनाला चालना मिळणार असून पर्यटन वाढल्यास घोडेवाल्यांनाही त्याचा फायदाच होईल, अशी भूमिका कर्जत माथेरानचे आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली आहे. घोडेवाल्यांकडून ई-रिक्षाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आज आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत माथेरानमध्ये घोडेवाले, नागरिक, व्यापारी आणि नगरपालिका प्रशासन यांची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार थोरवे यांनी ई रिक्षाच्या निर्णयाची पाठराखण केली.


माथेरानमध्ये गेल्या दीडशे वर्षांपासून म्हणजे ब्रिटिशकालापासून वाहतुकीसाठी हात रिक्षाचा वापर केला जात होता. ही हातरिक्षा माणसांकडून ओढली जात होती, या अमानवी प्रथेविरोधात एका सामाजिक संघटनेने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती. अखेर याचिकेच्या संदर्भात निर्देश देताना सर्वोच्च न्यायालयाने माथेरानमध्ये ई-रिक्षाची चाचणी करण्याची परवानगी दिली. त्यामुळे वाहनबंदी असलेल्या माथेरानमध्ये तब्बल 172 वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ई- रिक्षा सुरू झाली. 


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने माथेरान शहरात ई-रिक्षाची चाचणी करण्यात आली. ब्रिटिश काळापासून माथेरानमध्ये वाहन बंदी कायदा लागू करण्यात आल्याने मग माणसांना विशेषतः पर्यटकांना ये जा करण्यासाठी हात रिक्षाचा वापर सुरू होता. त्याशिवाय 2003 ला सुप्रीम कोर्टाने माथेरानला इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून घोषित केले, त्यामुळे हा वाहन बंदी कायदा तसाच सुरू राहिला, त्यामुळे इथे कोणत्याही वाहनाला परवानगी मिळत नव्हती. 


काही महिन्यांपूर्वी झालेल्या, ई-रिक्षाच्या चाचणीसाठी जिल्हाधिकारी यांनी चाचणीकरिता एका शिष्टमंडळाची स्थापना केली होती. त्यामध्ये प्रादेशिक परिवहन विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस खाते, वनविभाग आणि माथेरानचे मुख्याधिकारी यांचा समावेश होता. त्यांच्या उपस्थितीत या ई-रिक्षांची चाचणी आज घेण्यात आली. या शिष्टमंडळकडून एका दिवसांतच तातडीने अहवाल बनवून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. ई-रिक्षा चाचणीसाठी महिंद्रा, एक्साईड, आयझित, रस्तोगी ह्या कंपन्यांनी आपल्या रिक्षा आणल्या होत्या. माथेरान नगरपालिकाच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी ही चाचणी माथेरान मधील विविध भागात केली होती.