रायगड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, आज त्यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) समाधीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे यावेळी मनोज जरांगे यांनी अनवाणी पायांनी रायगड सर केला. तसेच रायगडावरील माती त्यांनी आपल्या कपाळी लावल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांच्या या शिवभक्तीची चर्चा पाहायला मिळत आहे. 


दरम्यान, यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, "आज छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला आहे. तसेच, या पवित्र भूमीची माती कपाळी लावली आहे. मराठा आरक्षणाबाबत जो काही अन्याय होत आहे, तो लढा आता शंभर टक्के पूर्ण होणार आहे. ज्याप्रमाणे मराठे स्वराज्यात एकवटले होते, त्याचप्रमाणे आता एकवटले आहेत. आज शिवरायांचा आशीर्वाद घेऊन लढाई यशस्वी करण्यासाठी निघालो आहेत. तर, पवित्र विश्वाची ही राजधानी आहे. ज्या देशाला स्वराज्य दिलं, त्या दैवताच्या पवित्र भूमीवर आपण पहिल्यांदा तरी पायात चप्पल न घालता गेलं पाहिजे यासाठी अनवाणी पायांनी आलो असल्याचे जरांगे म्हणाले.


मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेतली, आरक्षण देतीलच...


पुढे बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की,"मराठा आरक्षणाबाबतचा मराठा समाजाचा खूप दिवसांचा लढा आहे. आता मराठा समाजाचे पुरावे देखील सापडले आहे. त्यामुळे, मराठा समाजाचा संयम न पाहता, तात्काळ पन्नास टक्क्यांच्या आत ओबीसीमधून मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं अशी रायगडावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती असणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर मराठा समाजाचा विश्वास आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ जाऊन शपथ घेतल्याने त्यांच्यावर मराठा समाजाला अत्यंत विश्वास आहे. 24 डिसेंबरच्या आत मुख्यमंत्री साहेब मराठ्यांच्या लेकरांना नक्कीच न्याय देतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी देखील अनेक शब्द पाळले आहेत, आणि आता ही पाळतील अशी अपेक्षा आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांनी सरकारला आशीर्वाद आणि सद्बुद्धी द्यावी" असेही जरांगे म्हणाले. 


मनोज जरांगेंची जालन्यात सभा...


मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, ज्या जालन्यातून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठीची लढाई सुरु केली, त्याच जालन्यात ओबीसी सभा घेत भुजबळ यांनी जरांगे यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे आता भुजबळ आव्हानाला उत्तर देण्यासाठी त्याच जालन्यात जरांगे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. 1 डिसेंबर रोजी जालना शहरातील आझाद मैदानात ही सभा होणार आहे. त्यामुळे, या सभेतून जरांगे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maratha Reservation : आतापर्यंतच्या सर्व समित्यांच्या शिफारशी तपासणार, त्रुटींचा अभ्यास होणार, मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची कार्यपद्धती ठरली