Lok Sabha Election 2024 : रायगड लोकसभा मतदारसंघात (Raigad Lok Sabha Constituency) महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराच्या प्रचारात जोपर्यंत मान सन्मान मिळत नाही, तोपर्यंत प्रचारात सहभागी होणार नाही अशी भुमिका रिपाइं (RPI) कार्यकर्त्यांनी घेतली आहे. भाजपचा (BJP) मित्रपक्ष म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी नेहमीच सहयोगाची भुमिका बजावली आहे. पुन्हा देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना विराजमान करण्यासाठी कामाला लागावे असे आदेश रामदास आठवले यांच्याकडून आपल्या पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे. पण, रायगड लोकसभा मतदारसंघात मित्रपक्षांकडून सन्मान मिळत नसल्याचा आरोप करत रिपाइंच्या नेत्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे महायुतीत पहिला खिंडार पडला असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे रायगड, मावळमध्ये रिपाइं कार्यकर्त्यांची महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराकडे पाठ फिरवली आहे.


रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे यांना महायुतीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र,  महायुतीच्या बैठकीत रिपाइं कार्यकर्त्यांना सन्मान दिला जात नसल्याचा आरोप रिपाईचे रायगडचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी केला आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यात आमचे 15 तालुकाध्यक्ष आहे. रायगड जिल्ह्यात रिपाइं ची मोठी ताकद आहे. महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना मला भेटायचं असून, त्यांनी मला बोलावले पाहिजे. पण, अजूनपर्यंत त्यांनी मला बोलावले नाही. आजच्या बैठकीत आमच्या पक्षाच्या सर्वांनी याबाबत खंत व्यक्त केली. मला विश्वास आहे, सुनील तटकरे आम्हाला नक्की बोलतील. आजच्या बैठकीत सर्व तालुका अध्यक्ष आणि नेत्यांनी तक्रारीचा पाढा वाचला असल्याचे नरेंद्र गायकवाड म्हणाले. 


दोन्ही खासदार आमची कामं करत नाहीत...


मावळ आणि रायगडमध्ये निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असलेले दोन्ही नेते अधिक खासदार होते. पण खासदार असताना त्यांनी कोणत्याही प्रकारचे काम रिपाइं पक्षाच्या कार्यकर्त्यांचे केले नाही. कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला नाही. गाव खेडे आणि वस्त्यांवर कुठल्याही प्रकारे विकास काम केली नाही. आमच्या कार्यकर्त्यांना कंपनी आणि व्यवसायात प्राधान्य द्यायला पाहिजे, पण तसे झाले नसल्याचं गायकवाड म्हणाले.


महायुतीत मानसन्मान मिळत नाही...


कुठल्याच प्रकारचा निधी आम्हाला उपलब्ध झाला नसून, आजच्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी समस्यांचा पाढा वाचला. त्यांच्यावर होणारा अन्याय त्यांनी बैठकीत व्यक्त केला आहे. आजच्या बैठकीत मानसन्मान मिळेल याबाबत मी कार्यकर्त्यांना शब्द दिला आहे. मात्र, आम्हाला सन्मान मिळाला नाही, तर पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. त्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचा देखील गायकवाड यांनी म्हटले आहे. 


अन्यथा पुढील निर्णय घ्यावा लागेल...


आजच्या बैठकीत जेव्हा माझ्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली, त्यावेळी मित्रपक्ष आमच्या कार्यकर्त्यांचे कामं अजिबात करत नसल्याचे दिसून आलं. निवडून येईपर्यंत फक्त आमची मतं तुम्हाला हवी असते का?, मत घेणार, निवडून येणार पण त्यानंतर आमच्याच कार्यकर्त्यांना तुम्ही काम देणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे इथे कामकाज चालत असेल, तर आम्हाला रामदास आठवले यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घ्यावा लागेल असेही गायकवाड म्हणाले. 


 



इतर महत्वाच्या बातम्या : 


Mahayuti Seat Sharing Dispute : आमच्या उठावामुळेच भाजप सत्तेत, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिंदेसेनेची हाय व्होल्टेज बैठक