Maharashtra Rain News : राज्यभरात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर काही ठिकाणी वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. काल राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. जाणून घेऊयात राज्याच्या कोणकोणत्या भागात पावसानं हजेरी लावली आहे.
मुंबईसह नवी मुंबई ठाण्यात मुसळधार पाऊस
सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरु आहे. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच लोकल रेल्वे सेवेवर देखील परिणाम झाला आहे. त्याचबरोबर ठाणे परिसारात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्नभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नवी मुंबईतही मुसळधा पाऊस सुरु आहे.
सोलापुरात जोरदार पाऊस, उजनीच्या पाणी पातळीत मोठी वाढ
राज्यात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. राज्याच्या विविध भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसापासून सोलापूर (Solapur) जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरण सध्या वजा पातळीत आहे, मात्र लवकरच ते अधिक पातळीत जाणार आहे. उजनी धरण झपाट्याने वजा पातळीतून अधिक पातळीकडे जाऊ लागले आहे. धरणात सध्या 18000 क्युसिक वीसर्गाने पाणी जमा होत असून आजची टक्केवारी वजा 7.72 एवढी आहे. त्यामुळं जर असाच पाऊस सुरु राहिला तर पुढच्या दोन दिवसात धरण अधिक पातळीत येण्याची शक्यता आहे.
पुण्यासह दौंड इंदापूर, बारामती तालुक्यात मुसळदार पाऊस
काल रात्रीपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुणे (Pune) शहरात पुन्हा हजेरी लावली आहे. पुणे शहरासाठी आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे, मुसळधार पावसामुळे संपूर्ण भिगवण परिसर जलमय झाला आहे. विशेषतः पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्विस रोडला तळ्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे. हा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे. भिगवण बस स्थानकात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भिगवणच्या थोरात नगर भागात रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहताना दिसत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही घरांमध्ये पाणी देखील शिरलं आहे. दरम्यान दुसरीकडे दौंडला देखील पावसानं झोडपलं आहे. दौंडमधील स्वामी चिंचोली गावाला पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने गावचा संपर्क तुटला आहे. अनेक घरे पाण्याखाली बुडाली आहेत. बारामती तालुक्यातून वाहणाऱ्या निरा डावा कालव्याला पिंपळी लिमटेक या ठिकाणी भगदाड पडलं आहे. या कालव्याचे सर्व पाणी नागरिकांच्या शेतात आणि घरामध्ये शिरले असून, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे.
आज दिवसभर पुणे शहरासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 3 ते 4 तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत.
नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस, शेती पिकांना फटका
नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे शेतकर्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे देखील अद्याप झाले नसल्याने शेतकरी नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करत आहे. नाशिक तालुक्यात शेतकऱ्यांच्या उभ्या कांदा पिकात पाणी साचल्याने संपूर्ण कांदा शेतात सडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तर जास्त पावसाने शेडमध्ये असलेली शिमला मिरची पिक खराब होऊन शेतकर्याचा हाता तोंडाशी आलेला घास हिरवल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नरमध्ये झालेल्या पावसात बाजार समितीमधील खळ्यात पावसाचे पाणी सचल्यानं कांदा गोण्यासह भिजला आहे. तर काही प्रमाणात कांदा अक्षरक्ष: वाहून गेला आहे. शेतीत भाजीपाला आणि बाजार समिती मधील कांदाचे मोठं नुकसान झाल्याने बळीराजाचे स्वप्न भंगल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त केली जातेय.
पावसाचा फटका राजगड जिल्ह्याला बसला असून नदी, नाले आणि सखोल भागात पाणीच पाणी झाले आहे. तर आजपासून पुढील 7 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. दरम्यान, हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड (Raigad Fort) महामार्गावरील कोंझर घाटात असलेल्या धबधब्यातील येणाऱ्या मुसळधार पाण्याने नव्यानं बांधण्यात आलेल्या मोरीच्या परिसरातील बायपास मार्ग खचला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक पोलीस प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे. किल्ले रायगड परिसरात देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तविलेलया अंदाजानुसार आज रायगडमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाची रिपरिप सुरू आहे. रायगडच्या श्रीवर्धन तालुक्याला पावसाने अक्षरक्ष: झोडपले आहे. या जोरदार पावसामुळे श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी गावात पाणीच पाणी झाले आहे. श्रीवर्धनमध्ये तब्बल 136 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ही नोंद आतापर्यंत सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कायम
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कायम आहे. जिल्ह्यातील सहाही बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पाणीपातळी 17 फूट 5 इंच इतकी झाली आहे. गेल्या 48 तासात पंचगंगा नदीची पाणीपातळी केवळ पाच इंचांनी वाढली आहे.
रत्नागिरीत मुसळधार पाऊस, एक जण गेला वाहून
रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरु आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दापोलीमधील वणंदमध्ये एकजण पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेला आहे. कामावरुन घरी जात असताना पाण्याच्या लोंढ्यात सायकल सहित वाहून गेला आहे. पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्यामुळे मदतकार्यात आले अडथळे. स्थानिकांडूक शोक कार्य सुरु आहे. राजेंद्र सोनू कोळंबे ( 48) असे पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. नाईट ड्युटी करुन सकाळी सायकल वरून घरी परतत असताना पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेला आहे. पुलावरुन पाणी जात असताना रस्ता ओलांडणे महागात पडले आहे.
सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस
सातारा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. फलटण तालुक्यातील धुमाळवाडी या फळांच्या गावात अतिवृष्टीमुळे प्रचंड असं नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय. धुमाळवाडी हे गाव हे फळांचे गाव म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे या गावात घरटी फळबाग पिकवली जाते. 30 वर्षानंतर एवढा मोठा पाऊस झाला यामुळे या गावात फळबागांचे प्रमाण जास्त आहे मात्र काल झालेल्या पावसानं या फळबागांचं प्रचंड असं नुकसान झालं असून यामध्ये डाळिंब,पेरू ड्रॅगन फ्रुट,चिकू, सिताफळ अशा 17 प्रकारच्या फळबागा पाण्याखाली गेल्या असून यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळतायेत या झालेल्या ढगफुटी सतृश्य पावसामुळे कोट्यावधींच नुकसान हे शेतकऱ्यांचे झालेले पाहायला मिळतंय. सरकारनं आम्हाला मदत करावी अन्यथा आमचं घर चालवणार तरी कसं असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये अवघ्या 4 तासात तब्बल 160 मिलिमीटर पावसाची नोंद
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये आज अवघ्या 4 तासात तब्बल 160 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. उल्हास नदीने इशारा पातळी गाठल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं असून पूरस्थिती निर्माण झाल्यास 12 हजार नागरिकांचं स्थलांतर करण्याची पालिकेची तयारी असल्याची माहिती मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिलीय.
वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस
वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेंदूरजना मोरे गावाकडून मंगरुळपीर शहराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने या मार्गावरून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झालाय वाहनधारकांना वाहन चालवतांना मोठी कसरत करावी लागत आहे. या पुलावरून दररोज वाहने आणि पादचारी ये-जा करतात. मात्र, पुलाच्या खचल्यामुळे आता मोठे वाहनांची वाहतूक बंद झाली झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना दूरच्या मार्गाचा वापर करावा लागत.
लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, टरबुज आणि कांदा पिकांचं मोठं नुकसान
लातूर जिल्ह्यात झालेल्या पावसाचा टरबुज आणि कांदा पिकांना मोठा तडाखा बसलाय. यामुळं टरबुज आणि कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत. लातूर जिल्ह्यातील दगडवाडी येथील शेतकरी उत्तम खोंड यांच्या दोन एकरातील टरबुजचे आणि चार एकरातील कांद्याचे पावसामुळे नुकसान झाले असून, शेतकरी विक्रम भोसले यांचेही दोन एकरातील टरबुज आणि तीन एकरातील कांद्याला पावसाचा तडाखा बसलाय. या शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा पावसात भिजल्याने जागेवरच सडून गेला असून, यामुळे त्यांचे जवळपास सहा ते सात लाखांचे नुकसान झालंय. मोठा आर्थिक खर्च करून पीक जोपासल्यानंतर ऐन काढणीच्या वेळी हातचे उत्पन्न गेल्याने सध्या हे शेतकरी चिंतेत असून, या संकटसमयी शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी त्यांनी केलीय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पाऊस
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. चिपळूण आणि गुहागरमध्ये मोठा पाऊस झाला आहे. मिरजोळीमध्ये रस्त्यावर पाणी आल्यामुळं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे शेतजमिनी पाण्याखाली गेली आहे.
रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस
रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे बिरदोले गावातील रोशन कचरू कालेकर वय- 25 वर्ष या तरुण मुलाचा शेतावर काम करीत असताना विज पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलिसांची टीम पोहचली असून पुढील अधिक माहिती घेत आहेत. तालुक्यातील उल्हास नदीला पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.या भागातील 35 गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी
मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हा यंत्रणांनी सतर्क राहून नागरिकांची सुरक्षितता, बचाव व मदतकार्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. त्यासाठीच्या उपाययोजना तात्काळ राबवाव्यात. मुसळधार पावसाची शक्यता असलेल्या भागातील नागरिकांनी सावध रहावे. सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा. स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहून त्यांच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे.