रायगड : रायगड लोकसभा मतदारसंघात (Raigad Lok Sabha Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि शिवसेना उबाठा गटाच्या अनंत गीते (Anant Geete) यांच्यात लढत झाली होती. या लढतीत सुनील तटकरे यांनी बाजी मारली होती. मात्र लोकसभेला अल्पसंख्यांक समाजाचे मतदान घटल्याचे दिसून आले होते. यावरून खासदार सुनील तटकरे यांनी मुस्लिम कार्यकर्त्यांसमोर मिश्किल टिप्पणी केली आहे. 


लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी केली जात आहे. राज्यभरात प्रचार सभांचा धुराळा उडाला आहे. आज महाड विधानसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार भरत गोगावले यांच्या प्रचार सभेला सुनील तटकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी तुफान टोलेबाजी केल्याचे दिसून आले.  


लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका


सुनील तटकरे यांनी लोकसभेला अल्पसंख्यांक समाजाचे घटलेले मतदान यावर मिष्कील भाष्य करत मुस्लिम कार्यकर्त्यांना चिमटा काढला. लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका. मी तुमच्यासोबत आहे आता बस कपभर चाय घ्या. बिस्मिल्ला करा म्हणजे सगळं चांगलं होईल. चार महिने पहिले तुम्ही सोबत नव्हता. ती आठवण आता मला कशाला करून देता.  मी सुध्दा आता ते विसरलो. मात्र आता या निवडणुकीला विसरू नका, असे त्यांनी म्हटले. सुनील तटकरे यांच्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. 


महेंद्र थोरवेंची सुनील तटकरेंवर टीका 


दरम्यान, रायगड जिल्ह्यातील जागावाटपावरून महायुतीत वाद झाल्याचे दिसून आले. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे गेला आहे. या मतदारसंघातून महेंद्र थोरवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, त्यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचं आव्हान असणार आहे. कारण, सुधाकर घारे अपक्ष लढणार असले तरीही त्यांना सुनील तटकरेंचं मोठं पाठबळ असल्याचा दावा महेंद्र थोरवे यांनी केला आहे. सुनील तटकरे यांनी महायुतीचा धर्म मोडला असल्याचा दावाही महेंद्र थोरवे केला आहे. महायुतीत असूनही सुनील तटकरे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा प्रचार करण्यास सर्वांना सांगत आहेत. त्यामुळे सुनील तटकरे हे महायुतीला लागलेला कॅन्सर आहेत असल्याची टीका महेंद्र थोरवे यांनी केली आहे. 


आणखी वाचा 


काका शरद पवारांवर टीका होताच, पुतण्याचा थेट सदाभाऊंना फोन, अजितदादांकडून 'हे सगळं बंद करण्याचा' सल्ला!