Jitendra Awhad on Sambhaji Bhide : दरवर्षी 6 जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Sohala) मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. तसेच या सोहळ्याला हजारो शिवप्रेमी उपस्थित राहताता. मात्र रायगडावर (Raigad) साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करून हा सोहळा तिथीनुसार साजरा करावा, असं वक्तव्य संभाजी भिडे (Sambhaji Bhide)  यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्त्वायनंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भिडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

आपलं वय झालं म्हणून आपण काहीही बरळत बसू नये. आपल्या तोंडावर थोडा तरी लागाम लावला पाहिजे, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी भिडे यांच्यावर जोरदार टीका केली.   शिवराज्याभिषेक उत्सव बंद करणे तुमच्या सात जन्मात तरी तुम्हाला शक्य नाही. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे राहतील तोपर्यंत रायगडावर 6 जूनला शिवरायांना मानवंदना आणि तोफेची सलामी दिली जाईल असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. भिडेंसारख्या वाचाळ वीरांना सत्ताधाऱ्यांनी लगाम लावावा. अन्यथा महाराष्ट्राचा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही. भेटू किल्ले रायगडावर... जय शिवराय असे ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीका केली आहे. 

नेमकं काय म्हणाले होते संभाजी भिडे?

रायगडावरील 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करायला पाहिजे,  शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होत असल्याचे संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.  संभाजी यांनी कोल्हापुरात बोलताना शिवराज्यभिषेकावर भाष्य केले. संभाजी भिडे म्हणाले की, तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत. दरम्यान, भिडे यांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरूनही भाष्य केलं आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको, असे विधान भिडे यांनी केले. या कुत्र्याचं राजकारण करू नये, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, इतिहास संशोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत भिडे यांनी वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास संशोधक बोलतात ते कोणत्या उंचीचे आहेत? अशी विचारणा केली. याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी भिडे यांनी केली. 

महत्वाच्या बातम्या:

सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष केला पाहिजे, रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको : संभाजी भिडे