Continues below advertisement

रायगड : नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. कोण खरं बोलतोय, कोण खोटं बोलतंय यासाठी देवासमोरील फुल उचलण्याचं आव्हान एकमेकांना दिलं जात आहे. त्यातच आता शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) त्याहीपुढे गेल्याचं दिसतंय. विधानसभेत ज्याने कुणी चुकीचं काम केलंय, त्याचा सत्यानाश होऊ दे, वाटोळं होऊ दे असं भरत गोगावले म्हणाले. भरत गोगावलेंनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंवर (Sunil Tatkare) निशाणा साधल्याचं दिसतंय.

भरत गोगावले यांनी श्रीवर्धन नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उमेदवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना टीका केली.

Continues below advertisement

Bharat Gogawale Navas : विरोधी काम करणाऱ्याचा सत्यानाश होवो

भरत गोगावले म्हणाले की, "आम्ही जर यांच्या विरोधात काम केलं असेल तर आम्हाला शिक्षा मिळो. ज्यांनी विधानसभेला आमच्या विरोधात काम केलं त्यांना धडा शिकवण्यासाठी मी हरिहरेश्वरमध्ये नवस करतो. ज्याने कुणी चुकीचं काम केलं असेल त्याचा सत्यानाश होवो, त्याचं वाटोळं होऊ दे."

गेल्या काही दिवसांपासून रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये विस्तवही जात नाही. दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदापासून सुरू झालेला वाद आता इतक्या टोकाला गेला आहे की एकमेकांना देवासमोरचं फुल उचलण्याचं आव्हान दिलं जात आहे.

Aniket Tatkare On Bharat Gogawale : अनिकेत तटकरेंचे गोगावलेंना आव्हान

मंत्री भरत गोगावले यांनी रोह्यातील एका कार्यक्रमात सुनील तटकरे यांच्यावर नाराजी व्यक्त करत खुलं आव्हान दिलं होतं. लोकसभेला आम्ही तटकरेंचा इमान राखला मात्र विधानसभेला तटकरेंनी आम्हाला फसवलं असा घणाघात सुनील तटकरे यांच्यावर केला होता. जर का हे कोणाला खरं वाटत नसेल तर तटकरेंनी महाडमधील विरेश्वर महाराज मंदिर आणि रोह्यातील श्री धावीर महाराज मंदिरातील फुल उचलून दाखवावं असंही त्यांनी म्हटलं होतं.

हे आव्हान स्वीकारत राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना प्रतिआव्हान दिलं. आम्ही ते फूल उचलायला तयार आहोत. एवढंच नाही तर नारळ ठेवायची देखील आमची तयारी आहे असं अनिकेत तटकरे म्हणाले. आम्ही विधानसभेला मंत्री भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांचं काम केलं. मात्र याबाबतीत फेक नरेटिव्ह पसरवण्याचे काम काहींनी केलं, हे कोणीही नाकारू शकत नाही, असं म्हणत त्यांनी शिंदेसेनेतील दोन्ही आमदारांना उत्तर दिलं.