राहुरी (अहमदनगर) : टाकाऊ प्लास्टिकपासून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्लास्टिकचा रस्ता साकारण्यात आला आहे. प्लास्टिकमुक्त राहुरी विद्यापीठ करण्यासाठी कुलगुरु डॉ. के. विश्वनाथा यांच्या ‘स्वच्छ व सुंदर विद्यापीठ’ प्रकल्पाच्या अंतर्गत हा रस्ता साकारण्यात आला आहे.


या रस्त्याचं उद्घाटन केंद्रीय कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. अशोक दलवाई यांच्या हस्ते करण्यात आलं. हा अर्धा किलोमीटरचा रस्ता प्लास्टिकच्या मिश्रणातून साकारण्यात आला आहे.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठात प्लास्टिकचा रस्ता बनवण्याचा हा पहिलाचा प्रयोग आहे. कुलगुरू डॉ. के. विश्वनाथा यांच्या संकल्पनेतून एक वर्षापासून विद्यापीठ परिसरात प्लास्टिक गोळा केले जात होते. आठवड्यातून एकदा कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिसरातील प्लास्टिक गोळा करण्याचा उपक्रम राबवला. गोळा केलेले प्लास्टिक कुंड्यांमध्ये साठवले.



राहुरी विद्यापीठाचा परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी परिसरातील प्लास्टिक गोळा केले़. हे प्लास्टिक 160 डिग्री तापमानावर वितळवून ते डांबरात मिसळण्यात आले. डांबरामध्ये मिसळणाऱ्या प्लास्टिकचे प्रमाण 10 टक्के ठेवण्यात आले. विद्यापीठाचे प्रवेशद्वार ते प्रशासकीय इमारत या दरम्यान अर्धा किलोमीटर लांबीचा हा प्लास्टिक रस्ता बांधण्यात आला आहे.

प्लास्टिकमुळे गटारं तुंबल्या जातात. शिवाय जनावरेही प्लास्टिक खातात. त्यावर उपाय म्हणून परिसर प्लास्टिकमुक्त विद्यापीठ हा उपक्रम हाती घेण्यात आला. गोळा केलेला प्लास्टिकचा कचरा रस्त्यात वापरण्याचा हा पहिलाच प्रयोग असून अन्य विद्यापीठातही वापरला जाणार आहे.

आधी अर्धा किलोमीटरचा हा रस्ता प्लास्टिकचा होईल. प्लॅस्टिक उपलब्ध होताच विद्यापीठ परिसरातील सर्व रस्त्यांमध्ये हे तंत्रज्ञान वापरले जाईल. या विषयी कुलगुरू के. विश्वनाथा यांनी आधीक माहिती दिली.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून कुलगुरू विद्यापीठ स्वछ्त्ता अभियान राबवीत असून प्लास्टिक पासून रस्ता तयार करण्याचा या प्रयोगाचे स्वागत अतिरिक्त सचिव डॉ. अशोक दलवाई यांनी केलं आहे.