नवी दिल्ली :  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकारिणीची दिल्लीत बैठक पार पडली. जेएनयूमधला हिंसाचार आणि नागरिकत्व कायद्यानंतर उद्भवलेली परिस्थिती या संदर्भात ही बैठक झाली. या बैठकीसाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित नव्हते. अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा होत असतांना त्यांची अनुपस्थिती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज दिल्लीत पार पडली. नागरिकत्व कायदा, जे एन यु विद्यापीठातला हिंसाचार असे अनेक ताजे विषय या बैठकीच्या अजेंड्यावर होते. मात्र या बैठकीसाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हेच उपस्थित नव्हते. काँग्रेस कार्यकारिणी ही पक्षासाठी निर्णय घेणारी सर्वोच्च समिती आहे. आज अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा असताना राहुल गांधी यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. राहुल गांधी हे सध्या विदेशात असल्याची माहिती कळते आहे.

विशेष म्हणजे दिल्लीत गेल्या महिनाभरात ज्या दोन महत्त्वाच्या घटना घडल्या त्या दोनही वेळी राहुल गांधी विदेशात होते. जामियात हिंसाचार झाला तेव्हा राहुल गांधी भारतात नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीत प्रियांका गांधी यांनी या मुद्द्यावर इंडिया गेटवर धरणं आंदोलन केलं. राजघाटावर आंदोलन करण्यासाठी काँग्रेसने राहुल गांधी यांच्या आगमनाची वाट पाहिली. जेएनयूत मागच्या रविवारी हिंसाचार झाला तेव्हा पासून राहुल गांधी गायब आहेत. त्यादिवशीही प्रियांका गांधी यांनीच सूत्रं संभाळली आणि त्या तातडीने एम्समध्ये जखमी विद्यार्थ्यांची पाहणी करण्यासाठी पोहोचल्या.

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून पायउतार झाल्यानंतर ते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्यही आहेत. काँग्रेस पक्षाच्या वेबसाईटवर या कमिटीची जी यादी आहे त्यात मनमोहन सिंह यांच्या शेजारी दुसऱ्या क्रमांकावर त्यांचं नाव आहे. खरंतर माजी अध्यक्ष हे समितीचे पदसिद्ध अधिकारी नसतात. पण कुठल्याही अधिकृत घोषणा शिवाय राहुल गांधी यांचा काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य म्हणून समावेश झाला आहे.

राहुल गांधी सध्या दौऱ्यावर आहेत
देशात इतक्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना राहुल गांधी मात्र का उपस्थित नाहीयेत? आजच्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीतही का उपस्थित नव्हते असा प्रश्न माध्यमांनी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत विचारला त्यावर प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उत्तर दिलं की, राहुल गांधी आता दौऱ्यावर आहेत. उद्या सकाळी के पक्षाच्या कामासाठी उपस्थित राहतील.