मुंबई : शेतकरी आंदोलनाचा आज सर्वात मोठा विजय झाला असून, शेतकऱ्यांची सरकट कर्जमाफी तत्वत: मान्य असल्याची घोषणा उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. सह्याद्री अतिथीगृहात सुकाणू समिती आणि उच्चाधिकार मंत्रिगटाची बैठक झाली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. 

आज दुपारी 1 वाजता ही बैठक सुरु झाली आहे. शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यावरुन वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आमदार बच्चू कडू आणि चंद्रकांत पाटील यांच्यात वाद झाला आहे.

LIVE UPDATE :

  • सुकाणू समिती आणि उच्चाधिकार मंत्रीगटाची बैठक संपली, सुकाणू समितीच्या प्रमुख सदस्यांची वेगळी बैठक सुरु, यात सुकाणू समितीचे रघुनाथ पाटील, बच्चू कडू, राजू शेट्टी, कोळसे पाटील, अजित नवले यांचा समावेश


गेल्या 1 जूनपासून शेतकऱ्यांनी कर्जमाफीसह हमीभाव मिळावा यासाठी संपाचं हत्यार उपसलं होतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली, तर सरकारकडून चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी उच्चाधिकार मंत्रिगटाची स्थापना केली. काल सुकाणू समितीच्या अंतर्गत बैठकीनंतर आज सह्याद्री अतिथीगृहावर उच्चाधिकार मंत्रिगटाशी बैठक सुरु होती.

सुकाणू समितीनं शेतकऱ्याच्या संपावेळी शेतकऱ्यांवर लादलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुन्हे मागे घेणं शक्य नसल्याचं सांगितलं. यावर चिडलेल्या बच्चू कडूंनी चंद्रकांत पाटलांशी वाद घालण्यास सुरुवात केली. दरम्यान आणखी 1 वाजता सुरु झालेली बैठक अद्याप सुरुच आहे.

सुकाणू समितीत फूट

मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनाला योग्य दिशा देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीतच उभी फूट पडल्याचं चित्र आहे. मुंबईत सुकाणू समितीची काल शनिवारी अंतर्गत बैठक झाली, ज्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. मात्र, या बैठकीला उपस्थित राहण्यास काही सदस्यांनी नकार दिला आहे.

मोठ्या मतभेदानंतर शनिवारी संध्याकाळी 4 वाजता सुकाणू समितीच्या बैठकीला काल शनिवारी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात सुरुवात झाली. या बैठकीला प्रहार संघटनेने सर्वेसर्वा आणि सुकाणू समितीचे सदस्य बच्चू कडू हे अनुपस्थित होते. तर बैठकीकडे डॉ. गिरधर पाटील, अनिल घनवट, रामचंद्रबापू पाटील आणि डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी पाठ फिरवली होती.

या बैठकीवर सुकाणू समितीचे सदस्य डॉ. गिरधर पाटील यांनी टीकेची झोड उठवली आहे. बैठकीचं निमंत्रण सर्वांना देण्यात आलं. पण आपल्याला याची माहितीही दिली गेली नाही असं डॉ. पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.

सुकाणू समितीत कोण कोण आहे?

  1. राजू शेट्टी

  2. अजित नवले

  3. रघुनाथदादा पाटील

  4. संतोष वाडेकर

  5. संजय पाटील

  6. बच्चू कडू, प्रहार

  7. विजय जवंधिया

  8. राजू देसले

  9. गणेश काका जगताप

  10. चंद्रकांत बनकर

  11. एकनाथ बनकर

  12. शिवाजी नाना नानखिले

  13. डॉ.बुधाजीराव मुळीक

  14. डॉ. गिरीधर पाटील

  15. गणेश कदम

  16. करण गायकर

  17. हंसराज वडघुले

  18. अनिल धनवट


मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या उच्चाधिकार मंत्रिगटात कुणाकुणाचा समावेश

  1. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर

  2. सहकारमंत्री सुभाष देशमुख

  3. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

  4. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

  5. परिवहन मंत्री दिवाकर रावते


ही समिती सर्व शेतकरी नेत्यांशी चर्चा करुन शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

कुठलाही प्रश्न संवादातून सोडवला जाऊ शकतो, त्यामुळे शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. तसंच उच्चाधिकार मंत्रिगटाशी चर्चेतून शेतकऱ्यांनी मार्ग काढावा असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे.

LIVE UPDATE :

शेतकरी आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, सरसकट कर्जमाफी तत्वत: मान्य

निकषासह सरसरकट कर्जमाफी तत्वतः मान्य : चंद्रकांत पाटील

सरकारसोबतच्या चर्चेने शेतकरी संघटनांचं समाधान : चंद्रकांत पाटील

आंदोलन काळात मुद्देमाल मिळाला नाही त्या केसेस मागे घेणार : चंद्रकांत पाटील

31 ऑक्टोबरपूर्वीच कर्जमाफी देण्याचा निर्णय : दिवाकर रावते

आजपासून अल्पभूधारक शेतकऱ्यांना नवं पीक कर्ज मिळणार

अधिवेशनापर्यंत शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे, अन्यथा पुन्हा आंदोलन सुरु करणार : राजू शेट्टी

25 जुलैपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पुन्हा आंदोलन : राजू शेट्टी

शेतकरी आंदोलनाची फलनिष्पत्ती आज चांगली झाली : रघुनाथ पाटील

रक्तदान करुन शेतकऱ्यांसंदर्भातील निर्णयाचं स्वागत करणार : आ. बच्चू कडू

सर्व गावात सुतळी बॉम्ब फोडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत करणार : आ. बच्चू कडू

या आंदोलनाच्या निमित्त सर्व शेतकरी नेते एकत्र आले, ही अभूतपूर्व घटना : डॉ. अजित नवले

मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारला 26 जुलैपर्यंतची मुदत : डॉ. अजित नवले

नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांसाठी सरकार एक नवीन योजना आणेल : चंद्रकांत पाटील