नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वापरलेले कोट विकले, तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, अशी बोचरी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते नंदुरबारमध्ये आयोजित केलेल्या शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
“कालपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसला शिव्या घालत होतो, पण तीन वर्षांपूर्वी वाजत-गाजत सत्तेवर बसवले ते चोर निघालेत. आता त्यांच्याकडून हिशेब मागत आहे म्हणून त्यांच्या जिव्हारी लागत आहे.”, असे म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.
“काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील सर्व चोर आता कोणत्या पक्षात आहेत? यांनी वाल्याचे वाल्मिकी करण्याचे मशीन आणले आहे का?” असे सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केला.
दरम्यान, याच मेळाव्यात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “कर्जमाफीसाठी ऑक्टोबरपर्यंत थांबण्याची मुख्यमंत्र्यांची भाषा म्हणजे लबाडाच्या घरचं जेवण अशी गत आहे”. त्यामुळे आता एकंदतरीत शिवसेना आणि भाजपमध्ये वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.