सोलापूर : राज्यातील तूर खरेदी 22 तारखेपर्यंत चालू राहील. गरज भासली तर आणखी मुदत वाढवू. सुट्ट्यांमुळे लेखी आदेश निर्गमित होण्यासाठी विलंब झाला. मात्र आज तातडीने राज्यातील सर्व नाफेड केंद्रांना आदेश पाठवणार असल्याची ग्वाही सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.
‘नाफेड’ने 15 एप्रिलनंतर कोणत्याही प्रकारची तूर खरेदी करणार नसल्याचं पत्र जारी केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. 16 एप्रिलपासून तूर खरेदीची कोणतीच जबाबदारी आपली राहणार नसल्याचं म्हटलं नाफेडने पत्रात म्हटलं होतं.
बारदाना उपलब्ध नसल्याने अगोदर पासूनच तुरीची खरेदी खोळंबली आहे. त्यातच नाफेडने हात वर केल्याने शेतकऱ्यांनी कुणाकडे पाहायचं हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र सरकारने तूर खरेदी करण्याची तारीख वाढवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
आतापर्यंत 34 लाख टन तुरीची खरेदी झाली आहे. ही गेल्या 15 वर्षातील विक्रमी खरेदी आहे. येत्या काळातही शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत नाही, तोपर्यंत तूर खरेदी करु, असं सुभाष देशमुख म्हणाले.