बीड : मंत्रिमंडळातील गृहखातं आपलं आवडतं खातं आहे, असे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. माजलगावमधील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पोलिस निवासस्थानाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते, तेव्हापासून मला गृहखात्याचे प्रचंड आकर्षण आहे. गृहखात्यात काम करण्याची संधी मिळाली नसली, तरी त्या खात्यावर माझं लक्ष असतं. कारण मंत्रिमंडळातील ते सर्वात आवडतं खातं आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
कामचं श्रेय घेतलं नाही म्हणून राजकारणात मोठं नुकसान होतं, असा अनुभव आला आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत जनता कुठेही गेली असली, तरी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणारी जनता मुख्य निवडणुकीत आमच्या पाठीशी राहिल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, पोलिसांना अधिकाधिक सुविधा देणे, हे आपलं काम असून, ग्रामीण भागात पोलिसांना घरं देण्याचा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत मांडून पूर्ण करु, असं आश्वासनही पंकजा मुंडेंनी यावेळी दिलं.